दुष्काळप्रश्नी मोदी-पवार भेट
By Admin | Updated: September 15, 2015 01:58 IST2015-09-15T01:58:44+5:302015-09-15T01:58:44+5:30
महाराष्ट्रातल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेल भरो आंदोलन सुरू असताना दिल्लीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र

दुष्काळप्रश्नी मोदी-पवार भेट
नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेल भरो आंदोलन सुरू असताना दिल्लीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्यातल्या दुष्काळाच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. जवळपास ३० मिनिटांच्या या भेटीत पवारांचे म्हणणे ऐकून त्यातल्या प्रमुख मागण्यांत लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले मात्र कोणतीही ठोस घोषणा केली नाही.
पंतप्रधानांच्या भेटीत पवारांनी मुख्यत्वे खरीपाची पिके नष्ट झाल्यामुळे निर्माण झालेली स्थिती, चारा वाटपाचा प्रश्न इत्यादी विषय मांडले. याखेरीज साखर निर्यातीचा प्रश्न मुख्यत्वे उपस्थित केला. पवार म्हणाले, राज्यात साखरेचे साठे पडून आहेत. राज्यातून ३0 हजार टन साखर निर्यात झाल्यास हा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. त्यासाठी केंद्राने अनुदान द्यावे, डाळिंब, संत्री व द्राक्षबागांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांनाही केंद्र व राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी पवार यांनी केली. मुंबईत सीआरझेड कायद्यामुळे होत असलेल्या दुष्परिणामांकडेही पवारांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.
दुष्काळग्रस्त भागाच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या जेल भरो आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले, ‘हे जेल भरो आंदोलन नसून जेलसे रोको आंदोलन आहे’. त्यावर भाष्य करण्यास नकार देत पवार इतकेच म्हणाले, शेलारांना दुष्काळचे गांभीर्य कळते का? मराठवाड्यात प्रत्यक्ष जाऊ न दुष्काळ म्हणजे नेमके काय, ते कधी त्यांनी पाहिले काय? आंदोलनापूर्वी राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना भेटून दुष्काळी उपाययोजनांची माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले नाही म्हणून रस्त्यावर उतरावे लागले. शेलार यांच्या पोरकट विधानांमुळेच १० महिन्यांत लोकांचा सरकारवरचा विश्वास उडाला, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
विखे-पाटील यांना कोपरखळी
पंतप्रधानांच्या भेटीनंतर आपल्या निवासस्थानी या भेटीची सविस्तर माहिती पवारांनी पत्रकारांना दिली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, बाळासाहेब विखेंच्या ‘दुष्काळ पवारांमुळेच पडला’, या टीकेला थेट उत्तर न देता, पवार म्हणाले, गेली कित्येक वर्षे मी राज्याचा मुख्यमंत्री नाही, ही बाब सर्वांनाच ठाऊ क आहे, तरीही काही लोक मलाच सर्व गोष्टींसाठी जबाबदार ठरवतात. बहुदा वयामुळे त्यांना असे प्रश्न पडत असावेत.