ठिबक सिंचनाचे वाजले तीन तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 01:22 IST2016-07-31T01:22:21+5:302016-07-31T01:22:21+5:30
पुरंदर तालुक्याला बारमाही बागायती बनवण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे स्वप्न आजही कागदावरच राहिले

ठिबक सिंचनाचे वाजले तीन तेरा
भुलेश्वर : दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायती बनवण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे स्वप्न आजही कागदावरच राहिले असून, गेली अनेक वर्षे सुरू असणारी ही योजना आजही पूर्णत्वाला गेली नाही. उलट दुरुस्तीअभावी खिळखिळी झाली आहे. योजनेच्या दुरुस्तीसाठी कोणताही निधी देण्यात आला नाही. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असणाऱ्या ठिबक सिंचन योजनेचे तीन तेरा वाजले आहेत.
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४४५०, दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५,४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ही योजना सुरू असताना एका तासाला चौदा हजार रुपये बिल येते, तर दिवसाला एक लाख दहा हजारांपर्यंत बिल येते. एक एमसीएफटी पाण्यासाठी ५२,००० रुपये मोजावे लागतात. यामुळे पाण्याचे पैसे भरल्यानंतर लगेचच पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. पैसे भरल्यानंतर पाण्याकडे डोळे लावून वाट पाहावी लागते. पाणी पाहिजे असल्यास खासगी माणसाकडे पैसे भरावे लागतात. नाहीतर कामधंदा सोडून सासवडला भरावे लागते. पाणी कधी येणार याची माहितीही मिळत नाही.
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा जन्मच ठिबक सिंचन पद्धतीने झाला. यासाठी संस्था उभारण्याचे काम बाकीच आहे. सर्वांना समान पाणीवाटप करण्यासाठी पाणी संस्था उभ्या राहणे गरजेचे आहे. सध्या पुरंदर तालुक्यात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सुटते. अनेक शेतकऱ्यांना याचा लाभही मिळतो. पुण्याचे रोजचे वापराचे, वाया जाणारे पाणी मुळा-मुठा नदीमध्ये येते. कोरेगाव मूळ या ठिकाणाहून पुरंदर उपसा जलसिंचन योजनेतून उचलले जाते. यामुळे दुष्काळी पुरंदर तालुक्याला ऐन उन्हाळ्यात पाणी मिळते. मात्र, संपूर्ण क्षेत्राला आजही पाणी मिळाले नाही.