'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:33 IST2026-04-07T12:26:33+5:302026-04-07T12:33:13+5:30

सुस्वभावी नेतृत्वामुळे डॉ. भूषण गगराणी अनेक आजी- माजी सहकाऱ्यांच्या ह्रदयात त्यांचे मानाचे स्थान राखून आहेत.

Dr Bhushan Gagrani An officer who not only gives orders but also guides junior | 'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी

'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी

-सुरेश काकाणी, सचिव, राज्य निवडणूक आयोग

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तपदावरून डॉ. भूषण गगराणी भारतीय प्रशासकीय सेवेतून नुकतेच निवृत्त झाले. प्रशासकीय सेवा ही केवळ एक नोकरी नसून ते एक व्रत आहे, हे ज्या मोजक्या अधिकाऱ्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे, त्यामध्ये ‘भूषण गगराणी’ हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. यूपीएससीच्या परीक्षेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आणि तेही मराठी भाषा घेऊन या सर्वांत कठीण परीक्षेचे शिखर सर करता येते, हे त्यांनी दाखवून दिले होते. पुढे मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले, हा अभिमानास्पद योगायोग ठरला.

चंद्रपूर जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांची पहिली ‘पोस्टिंग’ झाली. नंतर ते प्रशासकीय सेवेत अपर मुख्य सचिवपदापर्यंत एकएक पायरी पादाक्रांत करत गेले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, सिडको, एमआयडीसी, पर्यटन विभाग, मुख्यमंत्री सचिवालय अशा विविध विभागांतील आपल्या प्रत्येक पदाला श्री. गगराणी यांनी एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी असताना त्यांनी इंदिरा आवास योजना राबविण्यासाठी लोकसहभागाचा अनोखा पॅटर्न राबविला होता. त्यामुळे जिल्ह्यास देण्यात आलेल्या उद्दिष्टांपलीकडे प्रत्येक लाभार्थ्याला मोठी व पक्की घरे मिळू शकली. त्यांच्या लोकसहभागाच्या पॅटर्नचे राज्य व देश पातळीवर कौतुक झाले.

सिडकोत कार्यरत असताना नवी मुंबई विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न त्यांनी अत्यंत संयमाने सोडविला. त्यात त्यांच्यातले माणूसपण अधोरेखित झाले. पर्यावरणासारख्या संवेदनशील मुद्द्यांनाही त्यांनी योग्य तो न्याय दिला व विमानतळ उभारणीस चालना मिळाली. एमआयडीसीमध्ये ‘सिंगल विंडो सिस्टिम’ सुरू करून त्यांनी उद्योगवृद्धीला गती दिली.

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण हल्ल्याच्या वेळी रात्री फोर्ट परिसरात अंधाधुंद गोळीबार सुरू होता. त्यात त्यांचा वाहन चालक जखमी झाला होता. तरीही श्री. गगराणी हिंमतीने घराबाहेर पडले आणि त्यांनी मंत्रालय गाठले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव या नात्याने त्यांनी जखमी नागरिकांवरील उपचारासाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क केल्याने अनेकांचे प्राण वाचू शकले.

श्री. गगराणी यांच्यावर त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सोपविण्यात आली होती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरीतल्या पायाभूत सुविधांपासून ते सार्वजनिक आरोग्यापर्यंतच्या प्रत्येक विषयात त्यांनी जातीने लक्ष घालून सुसूत्रता आणली. महानगरपालिका आयुक्त म्हणून ते प्रत्येक दिवाळी सफाई कामगारांसोबत साजरा करत असत. कोल्हापूरच्या मातीत वाढलेल्या श्री. गगराणी यांनी आपल्या कृतीतून छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा वारसा जपला.

भारत निवडणूक आयोगाने प्रथमच गेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांचा मिळून एकच ‘जिल्हा निवडणूक अधिकारी’ म्हणून घोषित केले. तो पहिला मान श्री. गगराणी यांना मिळाला. तिथेही त्यांनी आपल्या शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध कार्यशैलीची छाप उमटविली आणि विधानसभेच्या निवडणुका निर्धोकपणे पार पाडल्या. त्याबाबद्दल भारत निवडणूक आयोगाने त्यांचा राष्ट्रीय स्तरावर विशेष गौरव केला. बृहन्मुंबईसारख्या महाकाय महानगरपालिकेची निवडणूकदेखील त्यांनी व्यवस्थापकीय कौशल्याच्या जोरावर एखादा अपवाद वगळता सुव्यवस्थितपणे पार पाडली.

प्रशासनात अनेकदा कठीण प्रसंग येतात. दबाव येतो; पण अशा वेळीही धैर्याने आणि शांत चित्ताने निर्णय कसा घ्यावा? याचा आदर्श त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. ते केवळ आदेश देणारे अधिकारी नव्हते, तर ते एक उत्तम मार्गदर्शक (Mentor) होते. सुस्वभावी नेतृत्वामुळे अनेक आजी- माजी सहकाऱ्यांच्या ह्रदयात त्यांना मानाचे स्थान आहे. मीही त्यास अपवाद नाही.

निवृत्ती म्हणजे औपचारिक कर्तव्याची समाप्ती; परंतु निवृत्ती म्हणजे कर्तृत्वाचा शेवट नाही. खरे तर हा एका नव्या पर्वाचा प्रारंभ असतो. वैयक्तिक आयुष्यात अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षांची पूर्ती करण्याची एक उचित संधीदेखील असते. त्या संधीचेही ते सोने करतील आणि त्याच वेळी विविध अधिकारी- कर्मचाऱ्यांना पुढेही त्यांचे मार्गदर्शन लाभत राहील, असा मला विश्वास आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Web Title : भूषण गगरानी: केवल आदेशक नहीं, एक मार्गदर्शक प्रकाश।

Web Summary : डॉ. भूषण गगरानी एक प्रतिष्ठित करियर के बाद सेवानिवृत्त हुए, जिन्होंने मराठी भाषा की स्थिति में महत्वपूर्ण योगदान दिया और नवी मुंबई हवाई अड्डे के पुनर्वास जैसे जटिल मुद्दों को हल किया। 26/11 के हमलों के दौरान उनके नेतृत्व और बीएमसी आयुक्त के रूप में उनके जन-केंद्रित दृष्टिकोण ने उनके समर्पण और प्रभावशाली सेवा को उजागर किया।

Web Title : Bhushan Gagrani: A guiding light, not just an order giver.

Web Summary : Dr. Bhushan Gagrani retired after a distinguished career, notably contributing to Marathi language status and solving complex issues like Navi Mumbai airport rehabilitation. His leadership during the 26/11 attacks and his people-centric approach as BMC commissioner highlight his dedication and impactful service.