दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:57 IST2025-11-04T16:55:05+5:302025-11-04T16:57:07+5:30
Double Voter List: मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.

दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
Maharashtra Local Body Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी मतदार याद्या पारदर्शक करा अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्यात दुबार मतदारावरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. त्यावरून राज्य निवडणूक आयोगाने मोठं पाऊल उचललं आहे. राज्यात ज्या मतदार याद्या आहेत त्यात जे संभाव्य दुबार मतदार असतील त्यांच्या नावासमोर डबल स्टार केले जातील. या मतदारांची ओळख पटवली जाईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषदा,४२ नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावेळी पत्रकार परिषदेत दिनेश वाघमारे म्हणाले की, जिथे संभाव्य दुबार मतदार असतील त्यांच्या नावासमोर डबल स्टार असेल. हा मतदार कुठल्या केंद्रावर मतदान करेल त्याची नोंद केली जाईल. आमच्याकडे एक टूल आहे त्याआधारे संभाव्य मतदारांच्या नावासमोर डबल स्टार करण्यात आले आहेत. दुबार मतदारांपर्यंत राज्य निवडणूक आयोगाचे कर्मचारी पोहचतील. असा मतदार केंद्रावर आल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल. त्याला एकाच केंद्रावर मतदान करता येईल असं त्यांनी सांगितले.
कशी असेल नवी मोहीम?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात येते. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत याबाबत त्यांच्याकडून नोंद घेतली जाईल. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाईल. त्या दुबार मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही परंतु प्रतिसाद न मिळाल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर या मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.
मतदारांसाठी नवीन मोबाईल APP
मतदारांना मतदार यादीत नाव शोधणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी नवीन मोबाईल APP विकसित केले आहे. मोबाईल APP च्या माध्यमातून मतदारांना आपल्या नावाबरोबरच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल. उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्रेही दाखल करावी लागतात. त्यातून मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारीविषयक पार्श्वभूमी, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिक समजू शकते. ही माहितीसुद्धा या APP पमधून मिळू शकेल.
महत्वाच्या तारखा
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात - १० नोव्हेंबर २०२५
नामनिर्देशनपत्रची दाखल करण्याची अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर २०२५
नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५
अपील नसलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मदुत- २१ नोव्हेंबर २०२५
अपील असलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२५
मतदानाचा दिवस - ०२ डिसेंबर २०२५
मतमोजणीचा दिवस - ०३ डिसेंबर २०२५