‘विधिमंडळ समित्यांची बदनामी होऊ देऊ नका’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:23 IST2025-05-20T14:21:49+5:302025-05-20T14:23:26+5:30
या समित्यांची बदनामी होणार नाही, उलट त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

‘विधिमंडळ समित्यांची बदनामी होऊ देऊ नका’
मुंबई : विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी व्हावे यासाठी कार्यरत असलेल्या ३० संसदीय समित्यांच्या कामकाजाचा प्रारंभ सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आला. या समित्यांची बदनामी होणार नाही, उलट त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
फडणवीस म्हणाले की, काही वर्षांपूर्वी या समित्यांची खूप बदनामी झाली होती. जिथेही काही समित्यांचे अध्यक्ष, सदस्य जायचे तिथे घबराट असायची. काही मागण्या केल्या गेल्या आणि त्यातूनही मोठी बदनामी झालेली होती. समित्यांच्या आड ब्लॅकमेल केले जात असल्याच्या तक्रारीदेखील झाल्या होत्या. मात्र, नंतर कारभारात बरीच सुधारणा झाली. या समित्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले जाऊ शकतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. समित्यांमध्ये जे सदस्य प्रभावीपणे काम करतात त्यांची कामे सरकार दरबारी अडत नाहीत, उलट ती लवकर होतात.
सभापती, अध्यक्षांनी दौऱ्यांबाबत ठरवावे
विधिमंडळ समित्यांचे परदेशातही दौरे आयोजित करण्याची मागणी आज झाली आहे. विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्षांनी त्या बाबत निर्णय घ्यावा, सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
विधिमंडळ समित्या या कामकाजाचा आत्मा
विधिमंडळाच्या समित्या या विधिमंडळ कामकाजाचा आत्मा आहेत. या समित्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करून विधिमंडळाला आणि सरकारलाही उत्तरादायी करता येते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, आदी उपस्थित होते.