परवडत नसेल तर टॉमेटो खाऊ नये, मरायला होत नाही; सुनिल शेट्टींना रविकांत तुपकरांचे प्रत्यूत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 16:28 IST2023-07-15T16:27:47+5:302023-07-15T16:28:07+5:30
तुमच्या मालकीच्या हॉटेलमधील जेवणही अनेकांना परवडत नाही, मग आम्ही काही म्हणतो का? उगाच कांगावा करू नका - तुपकर

परवडत नसेल तर टॉमेटो खाऊ नये, मरायला होत नाही; सुनिल शेट्टींना रविकांत तुपकरांचे प्रत्यूत्तर
देशभरात सध्या टॉमेटोच्या दरांनी आसमान गाठले आहे. कधी काळी पाच पैशांची किंमत न मिळाल्याने रस्त्या रस्त्यावर चिखल झालेला टॉमेटो आज बाऊंसर्सच्या सुरक्षेत ठेवावा लागत आहे. टॉमेटो महाग झाल्याने बॉलिवुडचा अण्णा सुनिल शेट्टीने जोरदार टीका केली आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुनिल शेट्टींना टॉमेटो परवडत नसेल तर त्यांनी खाऊ नये. उगाच कांगावा करण्याची गरज नाहीय. टोमॅटो खाल्ले नाहीतर सुनील शेट्टी मरणार नाही, असे तुपकर म्हणाले आहेत. टोमॅटोचे भाव वाढले म्हणून इंटरनॅशनल विषय करणाऱ्या अभिनेता सुनील शेट्टींना भाव परवडत नसेल तर टोमॅटो खावू नये. तुमच्या मालकीच्या हॉटेलमधील जेवणही अनेकांना परवडत नाही, मग आम्ही काही म्हणतो का? सुनील शेट्टीच्या बुद्धीची कीव येते, अशा शब्दांत तुपकर यांनी फटकारले आहे.
'आजकाल टोमॅटो दर भलतेच महागले आहेत. याचा परिणाम माझ्या घरातही झाला आहे. म्हणूनच मी टोमॅटो खाणंच कमी केलं आहे. तुम्हाला वाटत असेल मी तर सुपरस्टार आहे. मला या महागाईमुळे काही फरक पडत नसेल. पण हे खोटं आहे. आमच्यावरही महागाईचा परिणाम होतो.', असे शेट्टीने म्हटले होते.
'आम्ही ऑनलाईनच भाज्या ऑर्डर करतो.जर तुम्ही अॅपवर भाज्यांच्या किंमती बघितल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण यावर भाज्या बाजारापेक्षा आणखी स्वस्त मिळतात. मी स्वस्त आहे म्हणून अॅप वरुन ऑर्डर करत नाही तर ते ताज्या भाज्या देतात म्हणून ऑर्डर करतो. या भाज्या कुठून आणल्या आहेत याचीही ते माहिती देतात. तसंच याचा लाभ थेट शेतकऱ्यांनाच होतो, असे शेट्टीने म्हटले होते. यावरून सुनिल शेट्टीवर टीका झाली आहे.