बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचाही निवडणुकीत पराभव झाला होता, पण त्यानंतर काँग्रेस पक्ष नव्या जोमाने उभा राहिला, असे सांगत चेन्नीथला यांनी काँग्रेस कधीच संपत नाही, असे ठणकावून सांगितले.
मुंबई काँग्रेसचे एक दिवसीय शिबीर रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, सहप्रभारी यू.बी. व्यंकटेश, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आ. ज्योती गायकवाड यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
'रडायचे नाही, तर लढायचे!'
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आमच्या बाजूने लागले असते, तर आजचा उत्साह अधिक वाढला असता; पण पराभव झाला म्हणून कोणीही खचून जाऊ नये. काँग्रेस कार्यकर्त्याने पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले पाहिजे. रडायचे नाही, तर लढायचे हा बाणा अंगी बाळगला पाहिजे."
सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा विजयी झेंडा फडकवण्यासाठी ताकदीने कामाला लागण्याचे आवाहन केले.
राहुल गांधींचे नेतृत्व दिपस्तंभासारखे
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व आमच्यासाठी दिपस्तंभासारखे आहे. "नफरत छोडो, भारत जोडो" हा नारा देत भयमुक्त समाजासाठी राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढली. संविधानाचे संरक्षण आणि संवर्धन हे त्यांचे स्वप्न आहे.
सपकाळ यांनी जोर देत सांगितले की, "निवडणुकीत हार-जीत होतच असते; पण सत्ता नाही म्हणून थांबून चालणार नाही. नकारात्मकता सोडून द्या आणि लढाऊ बाणा अंगी बाळगा. संविधानाला अभिप्रेत असा भारत निर्माण करणे, हे आपले ध्येय आहे."
Web Summary : Following Bihar's election, Congress leaders rallied workers to focus on winning Mumbai's municipal elections. They emphasized resilience, drawing inspiration from past leaders and Rahul Gandhi's vision. The call: fight for a constitution-based India.
Web Summary : बिहार चुनाव के बाद, कांग्रेस नेताओं ने मुंबई के नगरपालिका चुनावों को जीतने पर ध्यान केंद्रित करने के लिए कार्यकर्ताओं को एकजुट किया। उन्होंने अतीत के नेताओं और राहुल गांधी की दृष्टि से प्रेरणा लेते हुए लचीलापन पर जोर दिया: संविधान आधारित भारत के लिए लड़ें।