दामिनी पथकामुळे रोडरोमिओ वठणीवर

By Admin | Updated: August 17, 2016 19:06 IST2016-08-17T19:06:52+5:302016-08-17T19:06:52+5:30

दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी रोड रोमियो व बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई करून आजपर्यंत एकूण १५० रोडरोमिओंवर कारवाई केली

Dondi Squadrator Rodromio Vatani | दामिनी पथकामुळे रोडरोमिओ वठणीवर

दामिनी पथकामुळे रोडरोमिओ वठणीवर

ऑनलाइन लोकमत

चाकण, दि. 17 - येथील पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी रोड रोमियो व बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई करून आजपर्यंत एकूण १५० रोडरोमिओंवर कारवाई केली आहे. दामिनी पथकातील महिला पोलीस रणरागिणी झाल्याने रोडरोमिओ चांगलेच वठणीवर आले आहेत. तसेच मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार चाकण पोलीस ठाण्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली.
निर्भया पथकात एक पोलीस अधिकारी, दोन महिला पोलीस व दोन पुरुष पोलीस यांचा समावेश असून हे पथक सध्या वेशात टेहळणी करून गस्त घालीत आहेत. मुलींची छेडछाड होणाऱ्या ठिकाणी लक्ष ठेवून साध्या वेशात स्टिंग ऑपरेशन करून कारवाई करीत आहे, त्यासाठी कॅमेरा व व्हॉइस रेकॉर्डिंग करून गुन्हे दाखल करण्यात येत आहे व यापूढेही कायमस्वरूपी चालू राहणार आहे. निर्भया पथकातील नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. मुलाचे स्टिंग ऑपरेशन करून त्याच्या आई वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून आपल्या मुलाचा प्रताप त्यांना दाखविण्यात येत आहे. तसेच विवाहित पुरुष असल्यास त्याच्या पत्नीला पोलीस ठाण्यात बोलावून आपल्या नवऱ्याचा प्रताप दाखविण्यात येत असल्याने छेडछाड करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसला आहे. एखादी महिला तक्रार देण्यास पुढे येत नसेल तर महिला पोलीस फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे गिरीगोसावी यांनी सांगितले.
महाविद्यालय परिसर, एस टी बस स्थानक, बाजारपेठ व रस्त्यावर, नो पार्किंग मध्ये आदी ठिकाणी बेशिस्त पणे गाड्या लावणाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी स्कॉड मधील महिला पोलीस योगिनी मोरे, पुष्पलता जाधव, तृप्ती गायकवाड, मनीषा मोरे, सुप्रिया गायकवाड यांनी परिसरात बेधडक कारवाई केल्याने नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यामुळे महाविद्यालयीन मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. अशा कारवाई मध्ये पोलिसांनी सातत्य ठेवल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. याबाबत लोकमतने एस टी बस स्थानकातील अवैध वाहनतळ पार्किंग व रोड रोमिओंबाबत आवाज उठविला होता.
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण, उपनिरीक्षक महेश मुंडे, राकेश कदम, श्रीधर जगताप यांनी पोलीस स्टाफ, महिला पोलीस व महिला दक्षता समिती यांच्यासह परिसरातील श्री शिवाजी विद्यामंदिर, कला व वाणिज्य महाविद्यालय, बहुळ येथील सुभाष विद्यालय, कडाचीवाडी येथील पी के टेक्निकल कॅम्पस, कुरुळी येथील भैरवनाथ विद्यालय, खराबवाडी येथील नवमहाराष्ट्र विद्यालय, महाळुंगे येथील श्रीपतीबाबा विद्यालय, वाकी येथील पायस व प्रियदर्शिनी स्कुल, पाईट येथील ज्युनिअर कॉलेज आदी शाळांमध्ये जाऊन पोलीस पथकाने प्रबोधन केले आहे. त्यामुळे मुलीही जागरूक झाल्या आहेत. मुलींना थेट पोलीस ठाण्याचा दूरध्वनी, पथकातील अधिकारी व महिला पोलिसांचे मोबाईल नंबर्स मिळाल्याने अडचणीच्या प्रसंगी थेट संपर्क साधता येत आहे.
पुणे जिल्ह्यात ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव व उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चाकण विभागातील शाळा व महाविद्यालय परिसरात रोड रोमिंओंवर कारवाई सुरु ठेवली असून मुली व महिलांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी वेगवेगळी पथके करून परिसरात नेहमी प्रमाणे मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी सुरु ठेवली आहे. रोड रोमिओंना आळा घालण्यासाठी चाकण पोलिसांनी परिसरातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून प्रबोधन केले. तसेच पोलीस ठाण्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी व मुलींच्या छेड छाड वर उपाय योजना यावर मार्गदर्शन करून 'प्रतिसाद ऍप' ची माहिती दिली आहे. लवकरच शाळांमधील तक्रार पेट्याही तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Dondi Squadrator Rodromio Vatani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.