डोंबिवलीत सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: August 1, 2016 04:30 IST2016-08-01T04:30:51+5:302016-08-01T04:30:51+5:30
फेसबुकवरून ओळख वाढवून तिला लग्नास भाग पाडल्याचे आणि नंतर काका, चुलत दीर व पतीने सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण डोंबिवलीत उघडकीस आले

डोंबिवलीत सामूहिक बलात्कार
डोंबिवली : उत्तर प्रदेशातील तरुणीशी फेसबुकवरून ओळख वाढवून तिला लग्नास भाग पाडल्याचे आणि नंतर काका, चुलत दीर व पतीने सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण डोंबिवलीत उघडकीस आले आहे. याव्यतिरिक्त माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा छळ करण्यात आला अणि तिला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. तिने पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. काका, काकी आणि चुलत दीर पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
नालासोपाऱ्याचा रहिवासी असलेल्या कान्हा ठाकूर उर्फ राहुल गुलाब सिंग या तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीशी ओळख वाढवली. ही तरुणी उत्तर प्रदेशात राहते. तिचे फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. त्याला ती तरुणी दाद देत नसल्याने राहुलने आत्महत्या करण्याची धमकी देत तिच्यावर विवाहासाठी दडपण आणले. आत्महत्येच्या धमकीनंतर घाबरून त्या तरुणीने त्याच्याशी विवाह केला. विवाहानंतर राहुलने तिला डोंबिवलीत काकाच्या घरी आणले. तोही तेथेच राहू लागला. राहुलचा काका रमेश सिंग आणि चुलत दीर राजेश सिंग यानेही तिच्यावर बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्याबाबत, तक्रार केल्यावर पती राहुल आणि काकी अनिता यांनी दुर्लक्ष केले. या कृत्याला त्यांचीही मूकसंमती होती. त्यांनी तिच्या बाजूने कोणताही आवाज उठवला नाही. त्यांनी तिला दोषी ठरवून काका आणि चुलत दिराची बाजू घेतली. हा प्रकार घडत असताना पतीनेही तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. तर, घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तोंडावर अॅसिड टाकून विद्रूप करण्याची धमकी काकीने दिली. या कृत्यानंतर चौघांनी मिळून तिच्याकडे घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. त्यासाठी तिचा छळ सुरू झाला. नंतर, तिला वेश्याव्यवसायात लोटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत पती, काका, काकी आणि चुलत दिराविरुद्ध तक्रार दाखल केली. ती दाखल होताच पोलिसांनी पती राहुल गुलाब सिंग याला अटक केली.
पतीसोबतच काका, चुलत दीर आणि काकीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काका, काकी आणि चुलत दिराने पळ काढला आहे. पोलीस तिघांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)