चौकट मोडण्याची हिंमत आहे का?

By Admin | Updated: May 6, 2015 05:11 IST2015-05-06T05:11:25+5:302015-05-06T05:11:25+5:30

संयुक्त राष्ट्राच्या समितीने भारताला वैवाहिक बलात्काराकडे गुन्हा म्हणून पाहण्यास सुचविल्यानंतर यावर ही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Does the frame have the courage to break? | चौकट मोडण्याची हिंमत आहे का?

चौकट मोडण्याची हिंमत आहे का?

संयुक्त राष्ट्राच्या समितीने भारताला वैवाहिक बलात्काराकडे गुन्हा म्हणून पाहण्यास सुचविल्यानंतर यावर ही नव्याने चर्चा सुरू झाली आहे. विवाह झालेल्या स्त्रीकडे आपली भोगवस्तू म्हणून पाहून तिचा मी कसाही उपयोग करू शकतो, अशी काहीशी ढोबळ संकल्पना तिच्या पतीची असते. त्यामुळे पत्नीवर बळजबरी करून किंवा तिच्या परवानगीविना शरीरसंबंध ठेवण्यात आपल्याला काहीच गैर वाटत नाही. आपण आपल्या समाजाचे साचे ठरवून घेतले आहेत. पुरुषांनी याच साच्याप्रमाणे वागायचे, स्त्रियांनी याच साच्यामध्ये राहायचे. पुरुषप्रधान समाजव्यवस्था टिकविण्यासाठी केल्या गेलेल्या या व्यवस्थेत स्त्रीने व पुरुषाने चौकट मोडणे ् अजिबात अपेक्षित नाही. त्यामुळेच वैवाहिक बलात्काराला गुन्हा म्हणून पाहण्यास आपण नकार देतो.
---------------------

हो म्हणण्याचा तरी अधिकार कोठे आहे ?
हरीश सदानी
(लेखक स्त्री-पुरुष समानतेसाठी काम करतात, त्याचप्रमाणे मेन अगेन्स्ट व्हॉयलन्स
अँड अब्यूज - मावा ही संस्था चालवतात.)
आपल्याकडे एखाद्या दिवशी शारीरिक संबंध नको असतील तर पत्नीला नाही म्हणण्याचा अधिकार मिळालेला नाही, पण हो म्हणण्याचा अधिकारही तिला दिलेला नाही. हे सगळे सशक्त संवादाच्या अभावामुळे तयार
झालेले आहे. आपल्या समाजात मोकळेपणाने चर्चा होत नसल्यामुळे स्त्रीचा विचार अत्यंत एकांगी केला जातो.
स्त्रियांच्या आयुष्यातील पाच महत्त्वाची अंगे म्हणजे श्रम, संचार, लैंगिकता, पुनरुत्पादकता, मालमत्ता या सगळ््यांचा निर्णय तिचा पतीच घेतो. बहुतांश वेळेस पत्नीलाही यामध्ये काहीही गैर वाटत नाही, इतकी ही व्यवस्था खोल रुजवली गेली आहे. जातीसंस्था आणि विवाहसंस्थेतही हे मनावर खोलवर रुजवले जाते, की स्त्रीने प्रत्येक वेळेस पतीच्या मागोमाग गेले पाहिजे. अशा सामाजिक व्यवस्थेत वैवाहिक बलात्कारांना एकप्रकारे मान्यताच मिळून गेलेली दिसते. आपण लैंगिकतेचा अभ्यास तटस्थपणे केला पाहिजे. आजवर लैंगिकतेचा अभ्यासही पुरुषी चष्म्यातूनच झाला आहे. महिलेस काय आवडते, तिला काय बरे वाटते, हेसुद्धा पुरुष अभ्यासकांनीच ठरवून घेतले आहे. त्यामुळे समानतेच्या दिशेने पावले टाकायची असतील, तर तटस्थ अभ्यास होणे अत्यावश्यक आहे.

पुरुषांना काय वाटते?
2013 साली संयुक्त राष्ट्राने १० दजार पुरुषांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये बांगलादेश, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, श्रीलंका, पापुआ न्यू गिनी अशा देशांचा समावेश होता. त्यामध्ये झालेल्या अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर आले.

70-80%
पुरुषांनी दिलेले बलात्काराचे कारण समान व मुख्य होते. ते म्हणजे पुरुष समजतात की त्यांना आपल्या लैंगिक जोडीदाराची परवानगी न घेता शरीरसुख मिळविण्याचा हक्क आहे. त्यांनी मजेकरिता, कंटाळा आला, शिक्षा करण्यासाठी, राग आला म्हणून अशी कारणे देत पत्नीवर बळजबरी केली होती.
------------------
पूर्ण अभ्यासांतीच कायदा होऊ शकतो !
अ‍ॅड. उदय वारुंजीकर, लेखक कायद्याचे अभ्यासक आहेत़

वैवाहिक बलात्कार या संकल्पनेबद्दल आपल्या देशामध्ये फारशी माहिती नाही, त्याचप्रमाणे भारतीय मानसिकता व विवाहसंस्थेच्या संकल्पनेशी वैवाहिक बलात्काराची संकल्पना ताडून पाहिल्याशिवाय असा कोणताही कायदा करता येणार नाही. महिलांमध्येच वैवाहिक बलात्काराच्या संकल्पनेबद्दल अज्ञान असल्याने वैवाहिक बलात्काराच्या संख्येचा अंदाज बांधणे अशक्य आहे.
त्यासाठी व्यवस्थित सर्वेक्षण, अधिकृत आकडेवारी मिळवावी लागेल. त्यामुळेच अद्याप असा कायदा झालेला नाही
आपल्याकडे बहुसंख्य महिलांना स्वत:बद्दल व्यक्त होता येत नाही. शरीरसंबंधांसाठी संमतीची गरज असेत, ती द्यावी लागते वगैरे त्यांना माहीतही नाही. त्यामुळे हा पुरुषांचा अधिकारच आहे, अशीच व्यवस्था निर्माण झाली आहे. वैवाहिक बलात्काराबद्दल कायदा करायचा झाल्यास काही मुद्दे उपस्थित होतात़
तसेच कोणताही कायदा करताना निवडीचे स्वातंत्र्य आणि खासगी
आयुष्य जपण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवूनच करावा लागेल. तसेच इतर कायद्यांना विसंगतही करून चालणार नाही.
आरोग्य तसेच कायदा आणि सुव्यवस्था हे विषय समवर्ती सूचीमध्ये येतात़ त्यामुळे एखादे पुरोगामी, प्रगत राज्य असा कायदा करू शकते़ मात्र तो व्यक्तिस्वातंत्र्याच्या निकषावर कितपत टिकेल, याबाबत शंका आहे.
------------
विवाह म्हणजे केवळ शरीरसंबंध नव्हे !
वंदना खरे
वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरविल्यामुळे आपली विवाहसंस्था धोक्यात येईल, समाज कोसळून पडेल, असे म्हणणे म्हणजे शुद्ध लबाडी आहे. वैवाहिक बलात्काराला विरोध होण्यामागचे खरे कारण स्वामित्व हक्क हेच आहे. पुरुषाला विवाह करणे हे केवळ पत्नीवर स्वामित्व हक्क गाजविणे असेच वाटते. ही स्वामित्व हक्काची भावना जगभरामध्ये सर्वत्र आहे.
दक्षिण आशियाई देशांमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये हजारो पुरुषांनी ‘हो, आम्ही करतो बळजबरी पत्नीवर, त्यात चूक काहीच नाही,’ असे उत्तर दिले होते.
त्यामुळे जगभरातील पुरुषांना पत्नी ही शरीरसंबंधासाठी विवाहाद्वारे केलेली सोयच वाटत राहते. वाईट म्हणजे याचा पगडा आपल्यावर इतका जबरदस्त आहे की, अनेक स्त्रियांनाही त्यात काहीही गैर वाटत नाही. कोणत्याही प्रदेशावर किंवा वस्तूवरील स्वामित्व हक्क मिळविला की शत्रू नामोहरम होतो, असे जगभरामध्ये रूढ आहे.
त्यामुळे युद्धात होणाऱ्या बलात्कारांचे कारणही त्यात दडलेले आहे. ज्या प्रदेशावर युद्ध लादलेले आहे त्यांच्या प्रदेशावर, तेथील संपत्ती आणि महिलांवर तेथील पुरुषांचा हक्क आहे, असे समजले जाते. त्यामुळे त्या प्रदेशातील संपत्ती लुटल्यावर स्त्रियांवर बलात्कार केले जातात. म्हणजे त्यांचे सर्व स्वामित्व हक्क लुटले जातात, अशी भावना जिंकणाऱ्या देशाची असते़ आणि हे सर्व प्रत्येक युद्धात झालेले आहे; मग ते व्हिएतनामचे युद्ध असो वा आफ्रिकन देशातील. समोरच़्या शत्रू समुदायाला चिरडण्यासाठी, त्याच्यावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी सरळ सरळ स्त्रियांवर बलात्कार करण्याचा हा मार्ग अवलंबला जातो.
(वंदना खरे विविध सामाजिक विषयांवर लेखन करतात, स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांचे काम सुरू असत़े व्हजायना मोनोलॉगया नाटकाचे त्यांनी मराठी रूपांतर केले आहे.)

पुरुषप्रधानतेमुळे आपण समाजाचे कप्पे करून टाकले आहेत. स्त्रिया व पुरुषांना आपल्या कप्प्यानुसार वागावेच लागते. त्याचा खरेतर अनेक पुरुषांनाही त्रास होत असतो, मात्र त्यांना त्या कप्प्याचे नियम पाळावेच लागतात.
पुरुषांकडे थोडे अधिक अधिकार असल्याने त्यांना त्याचा त्रास कमी होतो. त्यामुळे पुरुषांनी संवेदनक्षम होण्याची गरज आहे. पुरुषप्रदान व्यवस्थेने दिलेले विशेषाधिकार थोडे बाजूला ठेवून समानतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
----------
विचारपूर्वक कायदा केला जावा
डॉ.हरीश शेट्टी - मानसोपचारतज्ज्ञ  असून, विविध विषयांवर समुपदेशनाचे व मदतीचे कार्य ते करतात.

वैवाहिक बलात्कारांची संख्या मोठी आहे. त्याबद्दल फार कमी जाणीव समाजात आहे. स्त्रियांनादेखील आपण वैवाहिक बलात्काराला बळी पडत असल्याचे समजत नाहीत. त्यामुळे त्याची व्याख्या प्रथम ठरविली जावी.
त्यामध्ये संमती पूर्ण घ्यायची का अर्धसंमती घ्यायची, तसेच पुरुषाच्या संमतीबद्दलही कायदा होण्यापूर्वीच विचार केला गेला पाहिजे. तसेच गुन्हा दाखल झाल्यावर त्याची सिद्धता कशी करायची, याचे स्पष्ट नियम व निकष ठरवावे लागतील. माझ्या मते, अशा गुन्ह्यांसाठी एनजीओ, वकील, मानसोपचारतज्ज्ञ, न्यायवैद्यक तज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांचे ज्युरी मंडळ न्यायमूर्तींना मदतीसाठी असावे, जेणेकरून खटल्यामध्ये मदत होईल. गुन्ह्याची बारीक तपासणी करून योग्य न्याय देणे शक्य होईल.

आकडेवारी काय सांगते?
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार १५ ते ४९ वयोगटातील २९ राज्यांमधील १.२५ लाख महिलांपैकी ४० टक्के विवाहितांनी आपल्या पतीद्वारे शारीरिक, लैंगिक, भावनिक हिंसाचाराला सामोरे जावे लागल्याचे सांगितले आहे.

 

(संकलन - ओंकार करंबळेकर)

Web Title: Does the frame have the courage to break?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.