मेडिकल प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरण्यास वेबसाईटचा खोडा
By Admin | Updated: June 16, 2014 20:00 IST2014-06-16T19:55:09+5:302014-06-16T20:00:56+5:30
२१ जून अंतिम कालावधी असताना अर्ज भरण्यास अडचणी

मेडिकल प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरण्यास वेबसाईटचा खोडा
अकोला : राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे; मात्र सदर वेबसाईट योग्य प्रकारे प्रतिसाद देत नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी येत असून, दिलेल्या मुदतीत हे अर्ज सादर होण्याची शक्यता कमी दिसून येत आहे.
पीएमटी दिलेल्या विद्यार्थ्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयात सरकारी कोट्यातून ५० टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागत आहेत. तर उर्वरित ५० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश महाविद्यालय स्तरावर मॅनेजमेंट कोट्यातून देण्यात येणार आहेत. सरकारी कोट्यातील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना १५ ते २१ जून हा कालावधी देण्यात आला आहे. यासाठी प्रशासनाकडून एक वेबसाईट देण्यात आली असून, यावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज भरताना महाविद्यालयाचा पसंतीक्रम देणे बंधनकारक असून, यासाठी महाविद्यालयाचे कोड या अर्जात नमूद करणे आवश्यक आहे; मात्र सदर वेबसाईटवर महाविद्यालयाचा कोड व पसंतीक्रम देण्यासाठी असलेली महाविद्यालयाची यादी उघडत नसल्याने विद्यार्थ्यांना हा अर्ज भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाविद्यालयाचे कट ऑफ मार्क्सही या ठिकाणी उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज सादर होत नसल्याने त्यांना या प्रवेशापासून वंचित ठेवण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर पुरेपूर माहिती मिळत नसल्याने हजारो विद्यार्थ्यांना हे अर्ज भरण्यापासून वंचित राहावे लागणार असल्याचा आरोपही त्यांच्या पालकांनी केला आहे.