भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 06:42 IST2025-04-23T06:42:15+5:302025-04-23T06:42:43+5:30
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी या मृत महिलेच्या उपचारात समावेश असलेल्या सर्व डॉक्टरांकडून माहिती गोळा करण्यात येणार आहे.

भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
मुंबई : गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन आणि उपचारात असलेल्या डॉक्टरांची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनेही या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. त्यांनी उपचारात सहभागी असलेल्या रुग्णालयांना नोटीस पाठवत उपचारात कोणते डॉक्टर होते त्याची माहिती मागितली आहे. त्यामुळे आता आयव्हीएफचे उपचार देणारे इंदिरा आयव्हीएफ सेंटर, सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटल येथील डॉक्टरांची चौकशी करण्यात येणार आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला पैशाअभावी उपचार देण्यास टाळाटाळ केल्यामुळे राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्णालयातील कामकाजाची पहाणी करण्यात येत आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी या मृत महिलेच्या उपचारात समावेश असलेल्या सर्व डॉक्टरांकडून माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे पत्र या तीनही रुग्णालयांना पाठविण्यात आले आहे. सर्व माहिती एकत्र केल्यानंतर त्यावर योग्य ती कार्यवाही करणे शक्य होणार आहे. - डॉ. विंकी रुघवानी, प्रशासक, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल
... मगच या प्रकरणी पुढील कार्यवाही ठरविणार
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने या प्रकरणाची चौकशी करावी, असे राज्य महिला आयोगाने सांगितले आहे. मंगेशकर रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्यापर्यंत सीमित ठेवली होती. या महिलेच्या उपचारात सहभागी असलेल्या सर्व डॉक्टरांची चौकशी करण्याचे ठरविले आहे. त्यानंतर त्या सर्व गोष्टी विचारत घेऊन पुढची कार्यवाही ठरविण्यात येणार आहे.