डॉक्टरांचे असहकार आंदोलन सुरूच
By Admin | Updated: July 4, 2014 01:18 IST2014-07-04T01:18:13+5:302014-07-04T01:18:13+5:30
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेने (मॅग्मो)मंगळवारपासून सुरू केलेले बेमुदत आंदोलन गुरुवारी कायम होते. नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या सहा जिल्ह्यातील ६५१ वैद्यकीय

डॉक्टरांचे असहकार आंदोलन सुरूच
ग्रामीण आरोग्य सेवा प्रभावित : ‘मॅग्मो’ बेमुदत आंदोलनाचा तिसरा दिवस
नागपूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेने (मॅग्मो)मंगळवारपासून सुरू केलेले बेमुदत आंदोलन गुरुवारी कायम होते. नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या सहा जिल्ह्यातील ६५१ वैद्यकीय अधिकारी या आंदोलनात सहभागी आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसेवा प्रभावित झाली असून मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे.
कामाचे तास निश्चित करणे, २००९-१० मध्ये जे सेवा समावेशनमध्ये स्थायी झाले आहेत, त्यांना पूर्वलक्ष लाभ मिळणे, ८०० वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थायी करणे, १ जाने. २००६ पासून सहावे वेतन आयोग लागू करणे आदी मागण्यांना घेऊन ‘मॅग्मो’ने हे बेमुदत आंदोलन मंगळवारपासून सुरू केले आहे. या आंदोलनात राज्यातील १२ हजार तर विदर्भातील ३ हजार ५०० वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावर मॅग्मो संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रमोद रक्षमवार आणि अध्यक्ष राजेश गायकवाड बेमुदत उपोषणावर बसले आहेत. ‘डॉक्टर्स डे’च्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील ३०० डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे देऊन ती संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे.
नागपूरच्या सदर येथील जिल्हा प्रशिक्षण पथकाच्या समोर मंडप टाकून मॅग्मोचे जिल्हा अध्यक्ष डॉ. विद्यानंद गायकवाड यांच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहेत. डॉ. गायकवाड यांनी सांगितले, नागपूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सर्वच इस्पितळात एमएलसी केसेस, शवविच्छेदन, इमरजन्सी रुग्णसेवा, बाह्यरुग्णसेवा, आंतररुग्णसेवा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे काम ठप्प पडले आहे. विशेषत: सरकारला दर दिवसाला पाठविण्यात येणारी आरोग्याची ताळेबंद माहिती (मेडिकल इन्फर्मेशन सिस्टिम) देणेही बंद आहे.
डागा फुल्ल
ग्रामीण भागातील रुग्णालयामधील तज्ज्ञ डॉक्टर आंदोलनात सहभागी झाल्याने विशेषत: प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालयात पाठविले जात आहे. इतरवेळी डागामध्ये दिवसाकाठी १५ प्रसूती व्हायच्या तिथे आजच्या घडीला ४०वर प्रसूती होत आहेत. रुग्णांची गर्दी वाढल्याने दोन महिलांना संसर्ग झाल्याची माहिती आहे. मेयो आणि मेडिकलमध्येही प्रसूतीची संख्या वाढली आहे.
२४ तासांचा अल्टीमेटम
आंदोलनात सहभागी झालेल्या काही डॉक्टरांना २४ तासांच्या आत कामावर परतण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
उद्या शुक्रवारी सकाळी ८ वाजतापर्यंत रुजू न झाल्यास ‘मेस्मा’ लावण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)