मुंबईकरांनो वाय-फाय हवंय? मग इथे क्लिक करा...
By Admin | Updated: January 14, 2017 08:35 IST2017-01-14T04:53:48+5:302017-01-14T08:35:55+5:30
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहर-उपनगरात ५०० वायफाय हॉटस्पॉटचे उद्घाटन केले. शहर-उपनगरातील

मुंबईकरांनो वाय-फाय हवंय? मग इथे क्लिक करा...
स्रेहा मोरे / मुंबई
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहर-उपनगरात ५०० वायफाय हॉटस्पॉटचे उद्घाटन केले. शहर-उपनगरातील ‘आपले सरकार मुम वायफाय’ या वायफाय सेवेला मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
घाटकोपर ६० फीट मार्ग, वांद्रे कलानगर, चेंबूर सद्गुरु हॉटेलनजीक, फॅशन स्ट्रीट, बोरीवली येथील शिवाजीनगर, रेणुकानगर कांदिवली अशा ठिकठिकाणी या वायफाय सेवेचा लाभ घेत मुंबईकर ‘टेक्नोसॅव्ही’ झाल्याचे दिसून आले.
मुंबईतील महत्त्वाची महाविद्यालये, जिथे विद्यार्थी-विद्यार्थिनी सतत वावरतात अशा जागीही वायफाय सेवा पुरवण्यात आली आहे. शिवाय गेट वे आॅफ इंडिया, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी व काही महत्त्वाच्या झोपडपट्ट्या येथेही हे वायफाय हॉटस्पॉट आहेत. २ ते ८ जानेवारी यादरम्यान वायफायची चाचणी घेण्यात आली. यावेळी जवळपास २३ हजार युझर्सकडून याचा वापर झाला. तसेच, दोन टीबी पेक्षा जास्त डेटा डाऊनलोड झाला. मुंबईला वायफाय शहर बनविण्यात येणार असून १ मे २०१७ पर्यंत संपूर्ण मुंबईत १२०० वायफाय हॉटस्पॉट बसविण्यात येतील. ‘मुंबई वायफाय’ ही देशातील सर्वांत मोठी वायफाय सेवा असून जगातील सर्वांत मोठ्या वायफाय सेवांमध्येही याची गणना होईल. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरूनही ही माहिती दिली आहे. तुमच्या परिसरातील वायफाय हॉटस्पॉट https://t.co/89CSobykNI या लिंकवर तुम्ही शोधू शकता.
वन टाइम पासवर्ड : वायफायला जोडण्यासाठी भ्रमणध्वनीचा क्रमांक नोंदणी केल्यावर त्यावर एक ‘वन टाइम’ पासवर्ड येईल. त्यानंतर वायफायशी जोडून घेता येईल. दिवसभरात एका व्यक्तीला फक्त अर्धा तास १०० एमबीपर्यंत डेटा वापरता येईल. त्यानंतर तो आपोआप इंटरनेटपासून तोडला जाईल. या वायफाय सेवेत वापरायोग्य नसलेली सर्व संकेतस्थळे ब्लॉक करण्यात आली आहेत. त्याच वेळी अर्धा तास झाल्यावरही सरकारी संकेतस्थळाशी वापरकर्ता जोडला जाऊ शकेल.
वायफाय सेवेशी कनेक्ट
महाविद्यालयीन प्रकल्प लागणारी माहिती या सेवेमुळे मिळवणे सोपे झाल्यामुळे आमचा ग्रुप या ठिकाणी येऊन वायफाय सेवेशी कनेक्ट होतो. - सोनम रहेजा, घाटकोपर.
इंटरनेटचा खर्च वाचतोय
या वायफाय सेवेमुळे इंटरनेटचा खर्च वाचतो आहे. त्या खर्चात पॉकेटमनी वाचवून आम्ही मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस साजरे करणार आहोत.
- आदित्य केणी, फॅशन स्ट्रीट.
कनेक्टीव्हीटी फास्ट
या वायफायची कनेक्टीव्हीटी फास्ट आहे, कुकिंगची आवड असल्याने या वायफाय सेवेशी कनेक्ट करुन यू-ट्युबवर व्हिडिओ पाहत असते.
- उज्ज्वला साळुंके, सीएसटी.