मन की नव्हे, धन की बात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 02:32 IST2017-04-19T02:32:58+5:302017-04-19T02:32:58+5:30
संघर्ष यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील यशामुळे व दबावामुळेच मुख्यमंत्र्यांना ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’मधून जनतेशी मन की बात करावी लागत आहे

मन की नव्हे, धन की बात करा
नाशिक : संघर्ष यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील यशामुळे व दबावामुळेच मुख्यमंत्र्यांना ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’मधून जनतेशी मन की बात करावी लागत आहे. मात्र, आता संपूर्ण कर्जमाफीसाठी मन की नव्हे शेतकऱ्यांसाठी धन की बात करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, तत्काळ कर्जमाफी करा. अन्यथा आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी यांनीही संघर्ष यात्रेतून तोडगा न निघाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, प्रसंगी पोलिसांनी गोळ्या चालविल्या तर गोळ्याही खाऊ, असे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा मंगळवारी नाशिकला पोहोचली. संघर्ष यात्रेदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफी द्या, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या, अशी भावना बोलून दाखविल्याची माहिती विखे यांनी दिली. तूरडाळ खरेदी ही केवळ काही मूठभर व्यापाऱ्यांना श्रीमंत करण्यासाठीच केली जात आहे. खरा शेतकरी त्यात भरडला जात आहे. जिल्हा बँकांना नोटाबंदीनंतर कर्ज पुरवठा करण्यास सरकार निधी उपलब्ध करून देत नाही, असे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)