दिवसाआड नको, दररोज पाणी द्या..!

By Admin | Updated: August 6, 2016 00:29 IST2016-08-06T00:29:55+5:302016-08-06T00:29:55+5:30

शहरात धो-धो पाऊस सुरू असताना पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा विषय मात्र पेटतच चालला आहे.

Do not lose heart, give water everyday ..! | दिवसाआड नको, दररोज पाणी द्या..!

दिवसाआड नको, दररोज पाणी द्या..!


पुणे : शहरात धो-धो पाऊस सुरू असताना पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा विषय मात्र पेटतच चालला आहे. ‘दिवसाआड पाणी देणे रद्द करून पुण्याला रोज पाणी द्यावे’ या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात महापौर प्रशांत जगताप यांच्यासह भारतीय जनता पक्ष वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी सकाळी ठिय्या आंदोलन केले. तरीही गेले वर्षभर सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय झालाच नाही. त्यामुळे महापौरांनी शनिवारी (दि. ६) सकाळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे जाहीर केले.
पालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, सभागृह नेते बंडू केमसे, मनसेचे रवींद्र धंगेकर, बाळासाहेब शेडगे, काँग्रेसचे सुधीर जानजोत, सुनंदा गडाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र पठारे, बॉबी टिंगरे व अन्य अनेक नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी जिल्हाधिकारी सौरव राव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. भाजपा व शिवसेनेचे सदस्य या वेळी अनुपस्थित होते. महापौरांनी नंतर सेना सदस्यांचाही रोज पाणी देण्याला पाठिंबा आहे, असे सांगितले.
शहरात, धरणक्षेत्रात धोधो पाऊस कोसळत आहे. धरणातील पाणी नदीत सोडले जात आहे. तरीही, पुण्यात गेले वर्षभर सुरू असलेली पाणीकपात रद्द केली जात नाही. पालकमंत्री विविध कारणे सांगत आहेत. कालवा समितीचा यात काहीही संबंध नसताना समितीच्या बैठकीतच निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात पाणीकपात रद्द करावी व पुणे शहराला रोज पाणी द्यावे, अशी मागणी महापौरांच्या नेतृत्वाखाली सर्व नगसेवकांनी केली. पाणीकपात रद्द झाल्याशिवाय दालनातून उठणार नाही, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हाधिकारी राव यांनी धरणातील पाणीसाठा समाधानकारक असल्याचे व पुण्याला रोज
पाणी दिले तरी चालण्यासारखे आहे, असे मान्य केले. मात्र, याबाबत सर्व संबंधितांशी बोलावे लागेल, अशी भूमिका घेतली.
>महापौरांनी केली टीका
पुण्याच्या हक्काच्या पाण्याची पालकमंत्री राजकारणातून अडवणूक करीत आहेत, असा आरोप महापौरांनी नंतर केला. फक्त बापट यांच्या अट्टहासामुळे पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात येत आहे, अशी टीका महापौर जगताप यांनी केली.
मागील वर्षी ६ सप्टेंबरला पाणीकपात सुरू झाली. तो मुहूर्त साधून बहुधा त्यांना कपात रद्द करण्याचा निर्णय घ्यायचा असावा, अशी उपरोधिक टीका महापौरांनी या वेळी केली.
>महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हेमंत संभूस यांनी पालकमंत्री बापट यांच्यावर टीका करणारे निवेदन जाहीर केले, तर अजय शिंदे यांनी बापट यांच्या संपर्क कार्यालयासमोर थेट उपोषणच सुरू केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व आंदोलन थांबविले.

Web Title: Do not lose heart, give water everyday ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.