ज्येष्ठांच्या 'गोल्डन पिढी'कडे दुर्लक्ष करू नका - सचिन तेंडुलकर
By Admin | Updated: August 15, 2016 21:52 IST2016-08-15T19:28:33+5:302016-08-15T21:52:40+5:30
ज्यांनी तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य दिले, तुमच्यासाठी त्याग केला. हालअपेष्टा सोसल्या त्या गोल्डन जनरेशन (ज्येष्ठांच्या सुवर्ण पिढीकडे) अजिबात दुर्लक्ष करू नका.

ज्येष्ठांच्या 'गोल्डन पिढी'कडे दुर्लक्ष करू नका - सचिन तेंडुलकर
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १५ - ज्यांनी तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य दिले, तुमच्यासाठी त्याग केला. हालअपेष्टा सोसल्या त्या गोल्डन जनरेशन (ज्येष्ठांच्या सुवर्ण पिढीकडे) अजिबात दुर्लक्ष करू नका. त्यांचा सांभाळ आणि योग्य सन्मान करा, असा मोलाचा सल्ला क्रिकेटचा देव आणि भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यांनी ठाण्यातील भरगच्च कार्यक्रमात दिला. ठाणे शहर पोलीस आणि 'आलेख' या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने कर्तव्य या उपक्रमाची स्थापना करण्यात आली. याच उपक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर तेंडुलकर यांनी हे आवाहन केले.
प्रारंभी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदीचा कलश, पुष्पगुच्छ, देऊन सचिनचा भव्य गौरव केला. तर आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, ठाण्याचे महापौर संजय मोरे आदींनी तमाम ठाणेकरांच्या वतीने विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन, तर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पोलिसांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी निवृत्त कर्नल त्रिलोक रावल आणि माजी शिक्षिका, कवयित्री गीता जोशी या ज्येष्ठांचा प्रातिनिधिक सत्कार केला.
ज्येष्ठांसाठी ठाणे पोलिसांनी सुरू केलेच्या उपक्रमाचे कौतुक करून सचिन उद्बोधन करताना म्हणाला की, भारतात 60 पेक्षा अधिक वय असलेल्यांची संख्या दहा टक्के आहे. या सुवर्ण पिढीचा योग्य तो सांभाळ केला पाहिजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. ही पिढी अत्यंत मौल्यवान आहे. कोणत्याही गोष्टीचा पाया भक्कम असणे महत्वाचे असते. तसेच या सुवर्ण पिढीचा सांभाळ करणे आवश्यक आहे. ज्यांनी तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रत जाण्याची संधी दिली. बाहेरच्या जगात येण्यासाठी स्वातंत्र्य दिले. करिअरला प्राधान्य देतानाच त्यांचा त्याग आणि कष्टाकडे दुर्लक्ष करू नका, असा मोलाचा सल्ला देऊन अगदी गाडी चालविताना एखाद्या ज्येष्ठाला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करा. त्यांना सांभाळून घ्या, असे कळकळीचे आवाहनही केले. ज्येष्ठांवर अन्याय होताना, त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, त्यांना मानसिक, शारीरिक छळ केल्याचे ऐकल्यावर मनाला वेदना होत असल्याचेही सचिनने सांगितले.
ज्येष्ठांचा आदर करण्याची शिकवण बालवयातच..
वांद्रयाला साहित्यसहवास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर वास्तव्याला असताना तिथे त्यावेळी लिफ्ट नव्हती. त्यावेळी घरी अगदी पोस्टमन जरी आला तर वडील त्याला आधी पाणी द्यायचे. या गोष्टीचे महत्त्व त्यावेळी कळाले नव्हते. पण हळूहळू या गोष्टी उमगू लागल्या. आयुष्यात एक चांगला माणूस होणे महत्वाचे असल्याची शिकवण वडिलांनीच दिल्याचे सांगून ज्येष्ठांचा आदर करण्याचे बाळकडू बालवयातच मिळाल्याचेही त्याने आवर्जुन सांगितले.
......
बचतीच्या पेटीत आशीर्वादाची शिदोरी असूद्या..
लहानपणी बचतीच्या पेटीत मी खाऊचे पाच पैसे टाकायचो. आता काळानुरूप यात बदल झाल्याने मुलांच्या रकमा वाढल्या आहेत. बचत पेटीत पैसे टाकताना ते कसे वाढतील हे पाहिले जाते, तसे आपल्या कर्तव्यातून, ज्येष्ठांच्या प्रति आपण केलेल्या सन्मानाने त्यांचे आशीर्वादांचा, शुभेच्छांचा भर कसा वाढेल, हे पाहिले पाहिजे, असेही त्याने सांगितले.
.........
आईनेही दिली नातवाला संस्काराची शिदोरी
आपली आई एलआयसीमध्ये नोकरी करायची. सकाळी घरातले काम करून नोकरी सांभाळून घरातल्यांना जेवण दिल्यानंतर रात्री ती पुन्हा डोंबिवलीला आईकडे जायची. अशी तिने तीन महिने आईची सेवा केली. पण आपण हे जे करतो ते उपकार नसून ते कर्तव्य आहे, असे आपल्या आईनेच तिच्या नातवाला सांगितल्याचीही एक आठवण त्याने आवर्जून सांगितली.
.............
आजीच्या मायेची ऊब..
लहानपणी रबरी बॉलने उन्हात खेळण्याऐवजी घरात एखादा खेळ खेळण्याचा आजीचा आग्रह असायचा. त्यानंतर कालांतराने वर्तमान पत्रातील माझ्याबद्दल आलेल्या काही बातम्यांनी तिचे मत बदलले. अख्खा दिवस प्रॅक्टिस करून घरी थकून झोपल्यानंतर आजी थकलेल्या हातांनी तेल लावायची. तिला तिच्यात त्राण नसले तरी त्या मायेच्या उबेने मला एक वेगळीच ऊर्जा मिळायची. कारण काळजी घेण्याची तिच्यात एक वेगळीच ताकद होती. त्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान करा. त्यांच्याकडून मिळणा-या आशीर्वादांच्या शिदोरी तुम्हाला आयुष्यात मोठे करणार असल्याचा सल्ला त्याने यावेळी दिला.
...............
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून ठाणे पोलीस आणि आलेख या संस्थेचे अभिनंदन केले. कै. आनंद दिघे आणि स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठांच्या प्रति आदर्शभावना ठेवण्याची शिकवण दिल्याचेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठांसाठी संस्कृती दिन साजरा करून त्यांना सन्मानाने वागणूक देण्यासाठी दिघे यांचा आग्रह असायचा. तर वयाने मोठे झाला तरी मनाने वृद्ध होऊ नका, असा सल्ला शिवसेनाप्रमुखांनी दिल्याचे ते म्हणाले. प्रत्येकाने ज्येष्ठांना मान-सन्मान देण्याचे कर्तव्य पार पाडले तर त्यांचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. वय झाले आहे आता समाजाला आपली गरज उरली नाही, अशी भावना त्यांच्यात होणार नाही. याची काळजी घेण्याचे सांगून एका मुलाने पत्नीच्या आहारी जाऊन आईचे काळीज काढल्यानंतर ठेच लागल्यानंतरही बाळा तुला लागले तर नाही ना? अशी आईची महती सांगणारी गोष्टही त्यांनी ऐकवली. मैदान आणि मैदानाबाहेर विनम्र. आईवडील, मोठ्या भावाच्या प्रति विनयशीलता भारतरत्न बनविते, असाही त्यांनी सचिनबद्दलचा उल्लेख केला.
.........
महिला पोलीस साधणार संवाद..
केअर लाईनच्या 1090 या क्रमांकावर ज्येष्ठांना पोलिसांच्या मदतीसाठी संवाद साधता येणार आहे. त्यावर ती आपली क्राईम व इतरही समस्या मांडू शकतील. यासाठी 20 महिला पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रारंभी ठाणे शहरात सुरू होणारा हा उपक्रम टप्याटप्याने जिल्हाभर राबविला जाणार आहे. तर असा उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी खास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
.............
असा होणार कर्तव्यचा उपक्रम
सुरुवातीला पोलिसांमार्फत सोसायट्यांना पत्र देऊन ज्येष्ठांसह सर्व व्यक्तींची माहिती संकलित केली जाणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, कर्नल रावत यांच्या सीनियर सिटीझन फोरम, ठाणे महापालिका यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. या उपक्रमांतर्गत कार्यकर्त्यांनाही मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. 1090 या क्रमांकावर माहिती मिळाल्यानंतर संबंधितांना वैद्यकीय मदत, मानसिक आधार आणि गुन्ह्यांसंदर्भात पोलिसांची मदत दिली जाणार असल्याचे आलेखचे सचिन साळुंखे यांनी सांगितले. खून, सोनसाखळी चोरी अशा गुन्ह्यांची उकल पोलीस करतातच. पण चार भिंतीच्या आत ज्येष्ठांना होणारा त्रास, अवहेलना समोर येत नाही. समाजालाही याचीच जाणीव करून देण्यासाठी त्यांना सन्मान देण्याचे महत्व पटवून देण्यासाठी पोलिसांच्या मदतीने ही संकल्पना प्रत्यक्षात आणल्याचेही ते म्हणाले.
.............
दोन प्रेमाचे शब्द द्या..
विभक्त कुटुंबपद्धतीने मुलगा आणि आई-वडिलांमधील संवाद हरवत चालले आहेत. त्यांच्यात एकटेपणाची भावना नष्ट झाली पाहिजे. त्यांना दोन प्रेमाचे शब्द द्या, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक गीता जोशी यांनी व्यक्त केली. तसेच मुलगाही सुनेच्या आहारी गेला आहे, असे न मानता त्यांनाही समजून घ्या, असेही त्या म्हणाल्या. एका ठिकाणी मुलगा परदेशी, सून अभियंता तरी सासूला मात्र वृद्धाङ्म्रमात ठेवले. मग त्या इभ्रतीचा काय उपयोग असा सवालही त्यांनी केला. तरुण पिढीला कर्तव्याची जाणीव करुन देणे गरजेचे असून त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको, अशी अपेक्षा पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी व्यक्त केली. सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही मार्गदर्शन केले.
...........
* क्षणचित्रे
* गडकरी रंगायतनबाहेर सचिन येणार असल्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती. त्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
* रंगायतन आणि बाहेरच्या संपूर्ण परिसरात मासुंदा तलावाभोवती दुचाकी आणि चार चाकी वाहने लावण्यासाठी जागाही शिल्लक नव्हती.
* सचिनची एन्ट्री आणि सूत्रसंचालक अस्मिता पांडे यांनी त्याचे नाव घेताच नाट्यगृहात प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात ज्येष्ठांसह तरुणांनी उभे राहून त्याचे स्वागत केले.
* सत्कारासाठी उल्लेख झाल्यानंतर आणि सत्कार होतानाही सचिन.. सचिन. असा प्रेक्षागृहातून आवाज देत त्याला ठाणेकरांनी जोरदार दाद दिली.
* गडकरीच्या आवारात सचिनच्या छबीच्या रांगोळीने सर्वाचे लक्ष वेधले होते.
* ज्येष्ठांसह महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी कर्मचा-यांनी गडकरी रंगायतन खचाखच भरले होते.
* केवळ असा उपक्रम किंवा कार्यक्रम नको तर कार्यक्रमानंतरही त्याची अंमलबजावणी आवश्यक असल्याचेही सचिन याने यावेळी सांगितले.
* ठाण्यात रणजी चषकाचे क्रिकेट सामने खेळण्यासाठी यायचो. शालेय मित्र मयूर कद्रेकर याच्या घरी येणो व्हायचे तसे आताही येत असल्याचे सचिनने आवजरून भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले.
* ऑलिम्पिकचे अॅम्बेसेडर असलेले सचिन व्यस्त शेडयूलमधून लंडन येथे डाव्या पायावर शस्त्रक्रिया झालेली असतानाही दुख-या पायाने या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे आलेखचे सचिन साळुंखे यांनी सांगितले.
* यावेळी सांजवताना ही चंद्रकांत पागे आणि विनोद सावंत यांची निर्मिती असलेली मुलाला ज्येष्ठांची काळजी घेण्याची त्यांना वेळ देण्यासाठीचे आवाहन करणारी एक भावनिक चित्रफीतही दाखविण्यात आली. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.