तरुणांना उपदेशाचे डोस देऊ नका
By Admin | Updated: February 4, 2015 02:09 IST2015-02-04T02:09:16+5:302015-02-04T02:09:16+5:30
ज्येष्ठ कवी, गीतकार गुलजार यांनी आजच्या तरुणांना कोणतेही उपदेश करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. तरूणांच्या हाती देश सुरक्षित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

तरुणांना उपदेशाचे डोस देऊ नका
पुणे : ‘अब हिंदुस्तान तुम्हारे पास है, उसे मुझे मत लौटाना, और आगे ले जाना...’ अशा शब्दांत तरुणाईच्या क्षमतेवर विश्वास प्रकट करीत ज्येष्ठ कवी, गीतकार गुलजार यांनी आजच्या तरुणांना कोणतेही उपदेश करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. तरूणांच्या हाती देश सुरक्षित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘जो बन रहा है वतन, चलो ना चले वतन की बात करे’, अशा शब्दांत त्यांनी इतरांनाही तरूणांना साथ देण्याचे आवाहन केले. माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहातर्फे आयोजित ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ‘जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते गुलजार यांच्यासह इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, बंगळुरू येथील प्राध्यापक त्रिलोचन शास्त्री यांना ‘आचार्य श्रेष्ठ’, खा. अनंतकुमार हेगडे यांना ‘जनप्रतिनिधी श्रेष्ठ’, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांना ‘जनजागरण श्रेष्ठ’ तर उद्योजिका खा. अनू आगा यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर गुलजार म्हणाले, माझ्या नसानसांत हिंदुस्तान आहे. त्याची आठवण काढावी लागत नाही. आताच्या तरूणांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे वाटते. त्यांच्याकडे पाच हजार वर्षांचा संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखू नये. त्यांच्याकडे क्षमता आहे. पण आहे तेथेच थांबू नका, आम्ही देश इथपर्यंत आणला. आता तुम्हाला तो आणखी पुढे न्यायचा आहे. मागील ६० वर्षांत भ्रष्टाचार किती वाढला. गंगा किती दूषित झाली? याला आमची पिढी जबाबदार आहे. यात तरूणांचा काय दोष ! त्यामुळे आता तरुणांना उपदेश न करता त्यांच्याकडूनच शिकण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. शास्त्री म्हणाले, देशातील सध्याची राजकारणाची स्थिती पाहता मूल्याधिष्ठित राजकारणाची गरज आहे.
देशात शौचालय, पिण्याचे पाणी, स्त्रियांची सुरक्षितता, दर्जेदार शिक्षणाचे प्रश्न गंभीर आहे. स्वच्छ भारत मोहिमेबरोबरच सर्वांची मनेही स्वच्छ व्हायला हवीत, असे पाडगावकर म्हणाले. आगा म्हणाल्या, आकर्षणांच्या मागे धावण्यापेक्षा ध्येय उराशी बाळगून इतरांसाठी समर्पित काम करण्याची वृत्ती जोपासायला हवी. हेगडे यांनी राजकारणातील गुन्हेगारी हे कटू वास्तव असल्याचे सांगितले. बँक आॅफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका व्ही. आर. अय्यर, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, पुरस्कार समितीचे समन्वयक प्रा. राहुल कराड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)