मुंबई बॉम्बस्फोटांबद्दल पश्चाताप वाटत नाही - यासीन भटकळ
By Admin | Updated: July 5, 2014 14:04 IST2014-07-05T14:02:19+5:302014-07-05T14:04:25+5:30
मुंबईतील साखळी स्फोटाद्वांरे निरपराध नागरिकांचा जीव घेणा-या यासीन भटकळने स्फोटांची कबूली देत या कृत्याचा पश्चाताप नव्हे गर्व वाटत असल्याचे म्हटले आहे.

मुंबई बॉम्बस्फोटांबद्दल पश्चाताप वाटत नाही - यासीन भटकळ
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ५ - मुंबईत २०११ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी अटक करण्यात आलेला इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासिन भटकळने हे बॉम्बस्फोट आपणच केल्याची कबूली देत त्याबद्दल आपल्याला पश्चाताप नसून उलट गर्वच वाटत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) भटकळने ही कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा सूत्रधार असणा-या भटकळवर मोक्काअंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान भटकळने ' हे बॉम्बस्फोट घडवून आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, त्याचा मला पश्चाताप वाटत नाही', असे त्याने म्हटले. उलट 'मी जे काही केले, त्याचा मला अभिमान वाटतो, असेही त्याने सांगितले.
१३ जुलै २०११ रोजी मुंबईतील झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर येथे झालेल्या बॉम्बस्फोटात २१ जण ठार तर सुमारे १४१ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाप्रकरणी भटकळसह त्याचा साथीदार असादुल्लाह अख्तर यालाही अटक करण्यात आली आहे.