आयुक्तांच्या आदेशाचे भय नाही !
By Admin | Updated: August 16, 2014 02:40 IST2014-08-16T02:40:24+5:302014-08-16T02:40:24+5:30
पोलीस दलातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी गटप्रमुखांवरील कारवाईचे आदेश वेळोवेळी त्या त्या आयुक्तांनी दिले. काही प्रकरणांमध्ये कारवाईही झाली

आयुक्तांच्या आदेशाचे भय नाही !
मुंबई : पोलीस दलातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी गटप्रमुखांवरील कारवाईचे आदेश वेळोवेळी त्या त्या आयुक्तांनी दिले. काही प्रकरणांमध्ये कारवाईही झाली, मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या वर्षी केलेल्या कारवाईतून आयुक्तांच्या आदेशांना पोलीस भीक घालत नाहीत, हे स्पष्ट होते.
या वर्षी मुंबईत एसीबीने एकूण ५२ सापळे रचून ५७ जणांना गजाआड केले. त्यापैकी १९ सापळे पोलिसांसाठी होते. त्यात एकूण २६ पोलीस अधिकारी-कर्मचारी गजाआड झाले. या कारवाईत कारागृह अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपासून पोलीस अंमलदार सहभागी आहेत. त्यामुळे पोलीस दलातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांना नवा उतारा शोधावा लागेल. ही परिस्थिती मुंबईप्रमाणेच राज्यात सर्वत्र आहे. या वर्षी अगदी कालच्या रविवारपर्यंत (१० आॅगस्ट) एसीबीने ७२२ सापळे रचले. त्यात एकूण ९७८ आरोपींना अटक झाली. या आरोपींमध्ये ६९० शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, तर १७० अन्य लोकसेवक आणि ११८ खासगी व्यक्ती सहभागी आहेत. या कारवाया प्रमाण मानल्यास महसूल विभाग सर्वाधिक भ्रष्ट असल्याची जाणीव होते. महसूल विभागातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी एसीबीने या वर्षी २०१ सापळे रचून एकूण २७४ अधिकारी, लोकसेवक आणि खासगी व्यक्तींना अटक केली. त्या खालोखाल पोलीस दलाचा दुसरा क्रमांक लागतो. एसीबीने पोलिसांसाठी १७१ सापळे रचून एकूण २३७ जणांना गजाआड केले. मात्र मागितलेल्या लाचेची रक्कम पाहिल्यास भ्रष्टाचारात पहिला नंबर येतो. महसूल अधिकाऱ्यांनी सुमारे २० तर पोलिसांनी तब्बल ४६ लाखांची लाच आजवर मागितल्याचे स्पष्ट झालेले आहे. पोलीस दलातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी तत्कालीन आयुक्त रॉनी मेंडोन्सा यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस ठाण्यातल्या शिपायाने लाच घेतल्यास वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई होणार, असा कठोर निर्णय घेतला. मेंडोन्सांनंतर मारियांपर्यंत हा आदेश कायम आहे. त्यानुसार काही प्रकरणांमध्ये कारवाईही झाली. मात्र असे असूनही भ्रष्टाचार थांबलेला नाही. खार येथील कारवाईतून पोलिसांची मानसिकता स्पष्ट होऊ शकते. खार ठाण्याचे एपीआय सुभाष सामंत, पोलीस निरीक्षक नेर्लेकर यांनी एका इस्टेट एजंटला गँगरेपच्या खोट्या केसमध्ये गुंतवू, अशी धमकी देऊन ५० लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी काही लाखांचा पहिला हप्ता मागितला. सामंत यांच्या घरी एजंटला बोलावले. तेथे एसीबीने सापळा रचल्याचे लक्षात येताच सामंत लाचेची रक्कम (२० हजार) घेऊन पहिल्या मजल्यावरून उडी मारून पसार झाला. अद्याप सामंतचा शोध लागलेला नाही.