आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुटी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 06:36 PM2019-08-02T18:36:00+5:302019-08-02T18:39:48+5:30

शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांचा निर्णय

District Collectors have the authority to grant leave to schools in case of emergency | आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुटी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुटी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

Next

राज्यात पाऊस वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात पडत असल्यामुळे ही बाब लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच शाळेला सुट्टी देता यावी म्हणून सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री अशिष शेलार यांनी घेतला आहे. त्याचा शासन निर्णयही आज जारी करण्यात आला आहे.

26 व 27 जुलै दरम्यान बदलापूर कर्जत या भागात संततधार पावसामुळे वाहतूक कोंडीमुळे काही विद्यार्थी वेळेत परीक्षेला पोहोचू शकले नाहीत. त्यामधे दहावी, विज्ञान भाग 2, इतिहास, समाजशास्त्र 12 वी समाजशास्त्र, बालविकास सहकार, टंकलेखक, लघुलेखक यापैकी ज्या परिक्षांना बसता आले नाही अशा या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसातील परीक्षेचे पेपर ही पुन्हा घेण्याचे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.


दरम्यान ही बाब लक्षात घेऊन यापुढे अशा आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली असल्यास शाळा अंतर्गत फेरपरीक्षा  घेण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना व  बोर्डाच्या परीक्षा घेण्याचे अधिकार  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना राहतील असा निर्णय ही घेण्यात आला आहे.

या जारी झालेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, राज्यात माहे जून, जुलै, ऑगस्ट तसेच सप्टेंबर या कालवधीमध्ये बऱ्याचदा संततधार पाऊस, सखल भागामध्ये पाणीसाचणे, पावसाच्या पाण्यामुळे जमीन विस्कळीत होणे  असे प्रकार घडत असतात. अनेक ठिकाणी धरणाचे पाणी सोडल्यामुळे नदीच्या प्रवाहातील पाण्याची पातळी वाढते, अतिवृष्टी, पूर परिस्थिती, यामुळे शाळेत नदी/ओढ्यामागे जाणाऱ्या  येणाऱ्या शाळकरी मुलांना/ विद्यार्थी/विद्यार्थिनींना/ शाळेच्या शिक्षकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशावेळी काही शाळकरी मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याच्या घटनाही घडतात. 


आपत्तीच्या पूर्वसुचनेवरून, हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या-त्या भागातील स्थानिक परीस्थितीचा आढावा घेऊन, संपूर्ण जिल्हाकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक  क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना  देण्यात येत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ज्या दिवशी सुट्टी जाहीर केली जाईल. त्या दिवशी शाळेमध्ये परीक्षा सुरु/आयोजित असल्यास, शाळा स्तरावरील परीक्षांचे पुनर्नियोजन करून पुनर्परीक्षा घेण्याचे अधिकार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना राहतील. महाराष्ट्र राहय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येत असलेल्या परीक्षा सुरु/आयोजित असल्यास, जिल्हाधिकारी यांचे सुट्टीचे आदेश  विचारात घेऊन, परीक्षांसंदर्भात पुनर्परीक्षा घेण्याचे अधिकार अनुक्रमे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना राहतील.

Web Title: District Collectors have the authority to grant leave to schools in case of emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.