एकतर्फी प्रेमातून विवाहितेची निर्घृण हत्या

By Admin | Updated: April 25, 2017 02:05 IST2017-04-25T02:05:12+5:302017-04-25T02:05:12+5:30

एकतर्फी प्रेमातून एका विवाहित महिलेची युवकाने घरात घुसून निर्घृण हत्या केली. सोमवारी दुपारी दिव्यात हा थरार घडला.

Dissent killing of marriage by unilateral love | एकतर्फी प्रेमातून विवाहितेची निर्घृण हत्या

एकतर्फी प्रेमातून विवाहितेची निर्घृण हत्या

मुंब्रा : एकतर्फी प्रेमातून एका विवाहित महिलेची युवकाने घरात घुसून निर्घृण हत्या केली. सोमवारी दुपारी दिव्यात हा थरार घडला. युवकाने दरवाजा आतून बंद केल्याने परिसरातील रहिवासी दरवाजाच्या जाळीतून हा थरार उघड्या डोळ्यांनी पाहात राहिले.
गणेशनगर भागात राहणाऱ्या मृणाल घाडीगावकर या ३२ वर्षांच्या महिलेवर मोबाइल दुरुस्तीचे काम करणारा अतुल सिंग हा २१ वर्षांचा तरुण एकतर्फी प्रेम करत होता. ती मात्र त्याला प्रतिसाद देत नव्हती. मृणालच्या नकारामुळे संतप्त झालेला अतुल सोमवारी दुपारी धारदार शस्त्र घेऊन तिच्या घरात घुसला. त्या वेळी मृणाल किचनमध्ये काम करीत होती. अतुलने लगेच दरवाजा आतून बंद करून तिच्यावर वार केले. या हल्ल्याने भांबावलेली मृणाल जीवाच्या आकांताने ओरडत होती. आरडाओरड ऐकून शेजारी जमा झाले. मृणालवर सपासप वार होताना ते दरवाजाच्या लोखंडी जाळीतून पाहत होते. परंतु, आतून कडी लावल्याने ते काहीही करू शकले नाहीत. या हल्ल्यात मृणालचा जागीच मृत्यू झाला.
शेजाऱ्यांनी दरवाजा बाहेरून बंद करून मुंब्रा पोलिसांना लगेच हा प्रकार कळवला. पोलिसांनी अतुलला ताब्यात घेतले. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले जाईल, अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र तायडे यांनी दिली. मृणालचा पती मुलुंड येथील एका मॉलमध्ये कामाला आहे. १० वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Dissent killing of marriage by unilateral love