‘विसरभोळ्या’ मोटरमनचा मनस्ताप
By Admin | Updated: August 1, 2014 04:23 IST2014-08-01T04:23:45+5:302014-08-01T04:23:45+5:30
सध्या ‘विसरभोळ्या’ मोटरमनचा प्रवाशांना मोठा मनस्ताप होऊ लागला आहे. अशीच घटना गुरुवारी दुपारी घडली.

‘विसरभोळ्या’ मोटरमनचा मनस्ताप
मुंबई : सध्या ‘विसरभोळ्या’ मोटरमनचा प्रवाशांना मोठा मनस्ताप होऊ लागला आहे. अशीच घटना गुरुवारी दुपारी घडली. सीएसटीला येणारी जलद लोकल भायखळा स्थानकात न थांबताच थेट सीएसटीला आल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला, भायखळा येथे उतरणाऱ्या प्रवाशांना पुन्हा परतीचा प्रवास करावा लागणार असल्याने संतापलेल्या प्रवाशांनी मोटरमनलाच घेराव घातला.
दुपारी १२.५५ वाजता पंधरा डब्यांची कल्याण-सीएसटी या जलद ट्रेनवर मोटरमन आर.पी. सिंग आणि गार्ड आर.एन. सिंग कार्यरत होते. दादर स्थानकातून ही ट्रेन सुटल्यावर भायखळा स्थानकात थांबणे अपेक्षित होते. मात्र ही ट्रेन भायखळा येथे न थांबता थेट सीएसटी स्थानकात जाऊन थांबली. त्यामुळे भायखळा स्थानकात उतरण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. ट्रेन थांबली का नाही, काय झाले याची प्रवासी एकमेकांना विचारणा करू लागले. दादर स्थानक सोडल्यानंतर ‘पुढील स्थानक भायखळा’ अशी उद्घोषणा लोकल डब्यात होत असतानाही भायखळा स्थानकात ती न थांबल्याने प्रवाशांचा पारा अधिकच चढला. सीएसटी स्थानकात लोकल आल्यानंतर महिला आणि पुरुष प्रवाशांनी मोटरमनला घेराव घालून त्याचे कारण विचारले. मात्र प्रवाशांचा राग पाहून मोटरमनकडून काहीएक उत्तर देण्यात आले नाही. अखेर माफी मागितल्यानंतर आणि रेल्वे सुरक्षा दल आल्यानंतर मोटरमनची सुटका झाली. (प्रतिनिधी)