आत्महत्येनंतर शेतकऱ्याच्या मृतदेहाची अवहेलना
By Admin | Updated: March 16, 2017 03:57 IST2017-03-16T03:57:08+5:302017-03-16T03:57:08+5:30
दुधगाव (प्रधानसांगवी) शिवारात एक मानवी हात सापडला. पोलिसांच्या तपासात तो हात मारोती सिरपुरे या शेतकऱ्याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे

आत्महत्येनंतर शेतकऱ्याच्या मृतदेहाची अवहेलना
किनवट (जि. नांदेड) : दुधगाव (प्रधानसांगवी) शिवारात एक मानवी हात सापडला. पोलिसांच्या तपासात तो हात मारोती सिरपुरे या शेतकऱ्याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून मारोती यांनी आत्महत्या केल्यानंतर कुत्र्यांनी त्यांच्या हाताचे लचके तोडल्याचे समोर आले आहे.
घरबांधणीसाठी मारोती सिरपुरे (३०) यांनी दीड वर्षांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड होत नसल्याने ते चिंताग्रस्त होते. विमनस्क अवस्थेतच त्यांनी घर सोडले. शोध घेऊनही तपास न लागल्याने त्यांच्या पत्नीने २४ फेब्रुवारी रोजी किनवट पोलिसांत तक्रार दिली होती.
दुधगाव (प्रधानसांगवी) जवळील एका खाजगी गोदामाच्या बाजूला ११ मार्च रोजी खांद्यापासून वेगळा झालेला हात कुत्र्यांनी आणून टाकला होता. त्याचा तपास सुरू असतानाच बुधवारी पुन्हा दुसरा हात कुत्र्यांनी आणून टाकल्याने प्रेत आजूबाजूलाच असावे, असा अंदाज बांधून गावकऱ्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा किनवट भोकर रस्त्यावरील एमआयडीसी भागात एक मृतदेह आढळला. प्रेताच्या बाजूला विषारी औषधाच्या बाटल्याही मिळाल्या. तेव्हा तो मृतदेह सिरपुरे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, आजी असा परिवार आहे़ (वार्ताहर)