कचराप्रश्नी प्रशासनाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: May 7, 2017 03:24 IST2017-05-07T03:24:44+5:302017-05-07T03:24:44+5:30
शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असतानादेखील प्रशासन अपेक्षित लक्ष देत नाही. गेल्या दहा वर्षांत शहराच्या विविध भागात ३० हून अधिक

कचराप्रश्नी प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असतानादेखील प्रशासन अपेक्षित लक्ष देत नाही. गेल्या दहा वर्षांत शहराच्या विविध भागात ३० हून अधिक कचरा प्रकल्प उभारण्यात आले; परंतु सध्या यातील अनेक प्रकल्प बंद पडले असून, सुरू असलेले प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत देखील नाही. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना पुणेकरांच्या दैनंदिन प्रश्नांमध्ये लक्ष घालण्यास वेळ नाही. त्यांना केवळ स्मार्ट सिटीच्या कामातच अधिक रस आहे. स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट तयार करणे, नवनवीन प्रस्ताव तयार करणे अन् कॉर्पोरेट लोकांच्या भेटी घेण्यात व्यस्त आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच शहराचा प्रश्न अधिक गंभीर झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँगे्रसच्या शहरअध्यक्षा व खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी येथे केला.
फुरसुंगी आणि उरुळी देवाच्या येथील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्याने गेल्या २१ दिवसांपासून शहराची कचराकोंडी झाली आहे. याबाबत चव्हाण म्हणाल्या की, कचराकोंडी सोडविण्यासाठी सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांना व महापौर, पदाधिकाऱ्यांना वेळ नाही. आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उदासीनता आहे. शहरात कचऱ्याचे ढीग साठलेले असताना प्रशासनाल हे ढीग दिसत नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नियोजनबद्ध प्लॅनिंग करणे, शहरात बंद पडलेले प्रकल्प त्वरित सुरू करणे आणि सुरू असलेल्या प्रकल्पाची शंभर टक्के क्षमतेचा वापर करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे दरवर्षी आॅडिट करणे, पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी ठेकेदारांवर लक्ष ठेवण्याचे कामदेखील अधिकाऱ्यांचे आहे; परंतु पुणेकरांच्या दैनंदिन व कचराप्रश्नात लक्ष घालण्यासाठी अधिकाऱ्यांनाच वेळ नाही.
...तर महापौरांच्या परदेश दौऱ्याची तिकिटे रद्द केली असती
आघाडी सरकारच्या काळात शहरात कचरा, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, त्या वेळी पालकमंत्री अजित पवार यांनी महापौरांना परदेश दौऱ्याची काढलेली तिकिटे रद्द करायला लावली आहेत. दौऱ्यावर गेलेल्या पदाधिकाऱ्यांना एका दिवसात मागेदेखील बोलावले आहे.
परंतु, सध्याच्या पालकमंत्र्यांना कचराप्रश्नाचे गांभीर्य नाही. कचराप्रश्न पेटला असताना पालकमंत्री आणि महापौर दोघेही परदेश दौऱ्यावर निघून गेले
आहेत, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा व खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.
फुरसुंगीत आंदोलक ठाम
फुरसुंगी : राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी आंदोलनस्थळास भेट दिली; मात्र आज मूक आंदोलन केल्याने काहीच चर्चा झाली नाही. दुपारी ग्रामस्थ राज्यमंत्री शिवतारे यांच्यासोबत चर्चेसाठी न गेल्याने सायंकाळी आयुक्त कुणाल कुमार व राज्यमंत्री कांबळे ग्रामस्थांच्या भेटीला आले. त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; मात्र ग्रामस्थांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे.
कचऱ्याच्या
विरोधात अ. भा. सेना आंदोलन करणार
पुणे : माजी आमदार अरुण गवळीप्रणीत अखिल भारतीय सेनेच्या पुणे शहर शाखेने प्रशासन व पदाधिकाऱ्यांना कचरा समस्या सोडविण्यात अपयश आल्याची टीका करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार व सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेचे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे-पाटील, शनी शिंगारे, सत्यभामा आवळे , बाबासाहेब पठारे, नजर खान, रोहित भोसले, विक्की शिंदे, माया शिंदे, हिरा भाऊ वाघमारे, समीर पवार, दीपक भंडलकर, प्रेम प्रसाद, करण कांबळे, किशोर शेळके, राजू देवकर, सागर वाबळे आदी या वेळी उपस्थित होते.
आता मुख्यमंत्र्यांशीच चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
फुरसुंगी : गेले एकवीस दिवस आंदोलकांकडे पाठ फिरवलेल्या राज्यमंत्री शिवतारे यांनी एका मुलाखतीमध्ये उद्या आंदोलन मागे घेऊन कचरा टाकण्यास सुरुवात होईल, असे स्पष्ट केल्याने ग्रामस्थ भडकले. येथील ग्रामस्थांना विश्वासात न घेता, कसलीही आश्वासने देणाऱ्यांसोबत चर्चा न करण्याच्या निर्णयामुळे शिवतारे यांनी विधानभवनात बोलावलेल्या बैठकीला ग्रामस्थ उपस्थित राहिले नाहीत. ग्रामस्थांनी मूक आंदोलन सुरू ठेवले.
कचराकोंडी सोडविण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे मध्यस्थी करण्यासाठी फुरसुंगीला पोहोचले खरे, पण त्यात त्यांना अपयश आले. आता चर्चा होईल तर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.
शुक्रवारी शिवतारे यांनी एका मुलाखतीत कचराप्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले; मात्र गावकऱ्यांशी चर्चा न करताच त्यांनी काही वक्तव्ये केल्याने ग्रामस्थ नाराज झाले. शिवतारे यांनी कौन्सिल हॉलला बैठकही
बोलावली; पण फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी उपस्थित राहण्यास नकार दिला व काळ्या पट्ट्या लावून मौन आंदोलन सुरूच ठेवले. आता केवळ मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले
आहे.
दरम्यान, पालकमंत्री या भागातील लोकप्रतिनिधी अशाप्रकारे कचराकोंडी होत असताना परदेश दौऱ्यावर गेल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधींना गांभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मागील आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी बोलावल्यावर आम्ही चर्चेसाठी गेलो होतो. आता मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन परिस्थिती पाहावी, मग आम्ही चर्चा करू.
- भगवान भाडळे, अध्यक्ष,
कचरा हटाव संघर्ष समिती
भाजपचा नाकर्तेपणा : अनंत गाडगीळ
एक केंद्रीय मंत्री, एक पालकमंत्री, एक राज्यमंत्री, दोन खासदार, सहा आमदार व महापालिकेत तब्बल १०१ नगरसेवक असा भला मोठा ताफा असतानाही भारतीय जनता पक्षाला शहराचा कचराप्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे, अशी टीका काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी केली.
गाडगीळ म्हणाले की, पुणेकरांनी भाजपाला एकहाती सत्ता दिली आहे. असे असताना त्यांचे कोणीही लोकप्रतिनिधी शहराच्या या महत्त्वाच्या प्रश्नावर काहीही हालचाल करायला तयार नाहीत. स्मार्ट सिटी हे त्यांनी पुणेकरांना दाखवलेले स्वप्नच आहे हे यातून सिद्ध होत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच खास बैठक घेऊन दोन वर्षांपूर्वी हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांना त्याचा विसर पडलेला दिसत आहे.
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचा भाजपाच्या या नाकर्तेपणामुळे कचरा झाला आहे. गेल्या ३ वर्षांत केंद्र किंवा राज्य सरकारने पुण्यासाठी कोणतेही भरीव काम केलेले नाही. उलट त्यांच्या अकार्यक्षमेतमुळे राज्यात तूरडाळ, शेतकरी आत्महत्या असे प्रश्न निर्माण झाले, त्यात आता पुण्याच्या कचरासमस्येची भर पडली आहे, अशी टीका गाडगीळ यांनी केली.