श्वेतांबर जैन मंदिरातील वाद, न्यायालयीन कार्यवाहीला स्थगिती
By Admin | Updated: July 16, 2014 01:16 IST2014-07-16T01:16:41+5:302014-07-16T01:16:41+5:30
यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा येथील प्राचीन श्वेतांबर जैन मंदिरात भगवान आदिनाथ यांच्या मूर्तीच्या जागेवर भगवान शीतलनाथ यांच्या मूर्तीची स्थापना करण्यासंदर्भातील निर्णयाच्या वैधतेसंदर्भात

श्वेतांबर जैन मंदिरातील वाद, न्यायालयीन कार्यवाहीला स्थगिती
सर्वोच्च न्यायालय : दारव्ह्यातील (यवतमाळ) प्राचीन मंदिर
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा येथील प्राचीन श्वेतांबर जैन मंदिरात भगवान आदिनाथ यांच्या मूर्तीच्या जागेवर भगवान शीतलनाथ यांच्या मूर्तीची स्थापना करण्यासंदर्भातील निर्णयाच्या वैधतेसंदर्भात वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे.
श्वेतांबर जैन मंदिर संस्थानचे अध्यक्ष प्रकाशचंद मुथा व इतरांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एम. आय. कलिफुल्ला व न्यायमूर्ती एस.के. सिंग यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी केल्यानंतर प्रतिवादी दिनेशचंद कोठारी व इतरांना नोटीस बजावून वरील स्थगनादेश दिला. प्रतिवादींना उत्तर सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.
श्वेतांबर जैन मंदिर संस्थानने आचार्यांचे मार्गदर्शन व शास्त्र नियमानुसार भगवान आदिनाथ यांच्या जागेवर भगवान शीतलनाथ यांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनेशचंद कोठारी व इतर भाविकांचा या निर्णयाला विरोध आहे. त्यांनी सुरुवातीला दारव्हा येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात निर्णयाला आव्हान दिले होते. मंदिरात मुलनायक म्हणून स्थापित भगवान आदिनाथ यांची मूर्ती हलवू नये व त्या ठिकाणी भगवान शीतलनाथ यांची मूर्ती स्थापित करू नये असा मनाईहुकूम काढण्याची विनंती त्यांनी केली होती. यानंतर प्रकाशचंद मुथा व इतरांनी दिवाणी प्रक्रिया संहितेच्या आदेश ७, नियम ११ अनुसार अर्ज दाखल केला. दिनेशचंद कोठारी व इतरांचा दावा दिवाणी स्वरूपाचा नाही. त्यांनी दावा दाखल करण्यापूर्वी मुंबई सार्वजनिक न्यास कायद्याच्या कलम ५० व कलम ८० अनुसार धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेतली नाही. यामुळे हा दावा चालू शकत नाही, असे प्राथमिक आक्षेप प्रकाशचंद मुथा व इतरांनी घेतले. दिवाणी न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता २५ एप्रिल २०१३ रोजी दिनेशचंद कोठारी व इतरांचा दावा खारीज करून उचित न्यायाधिकरणपुढे दाद मागण्याचे आदेश दिले होते.
या निर्णयाविरुद्ध दिनेशचंद कोठारी व इतरांनी जिल्हा न्यायालयात अपील केले. जिल्हा न्यायालयाने १६ मे २०१३ रोजी अपील फेटाळून लावले. यानंतर दिनेशचंद कोठारी व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने २६ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रकरण दिवाणी न्यायालयात परत पाठवून प्राथमिक आक्षेप गुणवत्तेवर ऐकून निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.
या निर्णयाविरुद्ध प्रकाशचंद मुथा व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयाने वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला आहे. सध्या कोणत्याही न्यायालयाचा मनाईहुकूम नसल्यामुळे गेल्या ३० मे रोजी भगवान शीतलनाथ यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. मोहित खजांची, अॅड. राजेंद्र डागा व अॅड. गौरव अग्रवाल यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)