फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी न लागल्याने महायुतीत नाराजांचे रुसवे-फुगवे सुरु झाले आहेत. सुरुवात शिवसेनेपासून झाली असून अजित पवारांची राष्ट्रवादीही त्यातून सुटलेली नाही. अशातच शिंदेंचे एक माजी मंत्री आणि एक भाजप समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतल्याचे वृत्त आहे.
मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेच उपनेत्याचा पहिला राजीनामा पडला होता. यानंतर अजित पवारांच्या गोटातून छगन भुजबळ यांनी पक्षाच्या मेळाव्याला गैरहजेरी लावत नाराजी जाहीर केली होती. आता या नाराजीचे वारे भाजपात सुरु झाले आहेत. तानाजी सावंतांनी देखील मंत्रिपद न मिळाल्याने राजभवनातील शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरविली होती.
भाजपातही आता नाराजी पसरू लागली असून नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे घर गाठत संघटनात्मक पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांना मंत्री न केल्याने भाजपा कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्यासाठी नागपूरकडे निघणार आहेत.
अशातच रवी राणांबाबत मोठे वृत्त येत आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या राणा यांना विस्तारात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. राणा यांनी अधिवेशन सोडून तडक अमरावती गाठली आहे. अमरावतीत भाजपाचे वर्चस्व असूनही सातपैकी एकालाही मंत्रिपद न मिळाल्याने राणा समर्थकांनी सोशल मीडियावर हल्लाबोल सुरु केला आहे. अशातच राणा हे अमरावतीला निघून गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.