गडकिल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांना थेट तुरुंगवासाची शिक्षा; विधेयक विधानसभेत सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:08 IST2024-12-16T12:06:58+5:302024-12-16T12:08:21+5:30
गडकिल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणी जाऊन वास्तूंचे नुकसान करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कायदा करण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे. हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक सादर करण्यात आले.

गडकिल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांना थेट तुरुंगवासाची शिक्षा; विधेयक विधानसभेत सादर
गडकिल्ले आणि प्राचीन ठिकाणी जाऊन मद्यपान केल्याच्या, वास्तूंचे नुकसान केल्याचे प्रकार राज्यात घडत असून, याला पायबंद घालण्यासाठी महायुती सरकारने आता कायदा केला जाणार आहे. यासंदर्भातील सुधारणा विधेयक कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सादर केले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तू शास्त्र विषयक स्थळे विशेष सुधारणा विधेयक विधानसभेत सादर केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "खूप महत्त्वाचं विधेयक हे आहे. गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर दारू पिणं, तिथल्या इमारतींचे नुकसान करणे, याला आतापर्यंत कायद्यामध्ये शिक्षा करण्याची काहीही तरतूद नव्हती. आता एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा अशा प्रकारचे दहशत निर्माण होईल, अशा प्रकारची तरतूद असलेलं हे विधेयक आहे."
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली होती. नंतर याचा मसुदा तयार करण्यात आला. यापूर्वी २०२० मध्ये सरकारने असा गुन्हा करणाऱ्यांना १ वर्ष कारावास आणि दहा रुपये दंडांची शिक्षा करण्याची तरतूद केली होती.
राज्यात अनेकदा किल्ल्यांवर दारू, ड्रग्स सेवन करून धिंगाणा घातल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. अशा प्रकार रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची मागणी विधानसभेत वारंवार केली गेली होती. त्यानंतर आता सरकारने शिक्षेचा कालावधी आणि दंडांच्या रकमेत वाढ केली आहे.