दिंडोशीत हिरे व्यापाऱ्याला लुटले!
By Admin | Updated: June 10, 2017 03:06 IST2017-06-10T03:06:58+5:302017-06-10T03:06:58+5:30
एका टोळक्याने हिरे व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकार गुरुवारी मालाडमध्ये घडला. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.

दिंडोशीत हिरे व्यापाऱ्याला लुटले!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एका टोळक्याने हिरे व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकार गुरुवारी मालाडमध्ये घडला. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.
एम. शाह (नावात बदल) हे मुंबईतील डी. बी. मार्ग परिसरात राहतात. व्यवसायाने हिरे व्यापारी असलेले शाह यांचे मालाड पूर्वच्या दफ्तरी रोडवर असलेल्या हिरे बाजारात येणे-जाणे असते. गुरुवारीदेखील अशाच प्रकारे काही कामानिमित्त ते मालाडला आले होते. परत जात असताना मालाडच्या मिलन हॉटेल परिसरात एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्यासोबत अन्य काही लोकदेखील असल्याचे शाह यांच्या लक्षात आले. काही वेळाने त्यातील एकाने व्यापाऱ्याच्या हातातील बॅग हिसकावली आणि तो पसार झाला. या बॅगेत चार लाखांची रोकड असल्याचा दावा शाह यांनी केला आहे. शाह यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोर फरार झाले होते. रात्री ९च्या सुमारास त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली.
व्यापाऱ्याला लुटणारी टोळी हिरा मार्केटपासूनच शाह यांचा पाठलाग करत आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज पाहण्यात येणार असून, अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली.