दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान

By Admin | Updated: December 14, 2015 02:49 IST2015-12-14T02:49:56+5:302015-12-14T02:49:56+5:30

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने रविवारी सन्मानित करण्यात आले.

Dilip Kumar received Padma Vibhushan award | दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान

दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने रविवारी सन्मानित करण्यात आले. वांद्रे पाली हिल येथील त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या प्रसंगी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानूही उपस्थित होत्या. त्या क्षणी भावुक झालेल्या सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्या कपाळाचे चुंबन घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अ‍ॅड. आशिष शेलार उपस्थित होते. दिलीप कुमार यांचा शुक्रवारी, ११ डिसेंबर रोजी ९३ वा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. चेन्नई येथील पूर परिस्थितीमुळे हा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनी करण्यात आली होती, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारण्यासाठी त्यांना दिल्लीतील समारंभाला जाता आले नव्हते.
‘लोकमत’ने यापूर्वी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इअर’ या पुरस्कार सोहळ्यात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन्मानित केले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dilip Kumar received Padma Vibhushan award