एकाच पदवीबाबत दोन विद्यापीठांत मतभेद
By Admin | Updated: September 12, 2014 00:46 IST2014-09-12T00:46:04+5:302014-09-12T00:46:04+5:30
एकाच पदवीबाबत दोन विद्यापीठांत मतभेद असल्याची बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका प्रकरणामुळे पुढे आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एम.एस्सी.

एकाच पदवीबाबत दोन विद्यापीठांत मतभेद
हायकोर्टातील प्रकरण : विद्यार्थिनीचा प्रवेश स्थानांतरित
नागपूर : एकाच पदवीबाबत दोन विद्यापीठांत मतभेद असल्याची बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका प्रकरणामुळे पुढे आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एम.एस्सी. (आयटी) पदवी एम.टेक़ (कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता आवश्यक पात्रता नाही. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मात्र याउलट निकष आहे. परिणामी एका विद्यार्थिनीला नागपूर विद्यापीठातून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्थानांतरित करण्यात आले आहे.
पूनम मकेश्वर असे विद्यार्थिनीचे नाव आहे. पूनमने एम.एस्सी. (आयटी) पदवी मिळविल्यानंतर ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण केली. तिला २०१३-१४ शैक्षणिक वर्षामध्ये केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार महागाव येथील तुळशीराम गायकवाड पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात एम.टेक़ (कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात आला. यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वरील निकषाप्रमाणे पूनमचा प्रवेश रद्द केला. याविरुद्ध तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नागपूर विद्यापीठाने प्रवेश वैध ठरवावा किंवा प्रवेश वैध ठरेल अशा दुसऱ्या महाविद्यालयात स्थानांतरित करण्यात यावे अशी विनंती तिने केली होती.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम.टेक़ (कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता एम.एस्सी. (आयटी) पदवी वैध समजली जाते.
ही बाब लक्षात घेता न्यायालयाने पूनमला जळगाव येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये एम.टेक़ (कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश देण्याचे निर्देश दिलेत. हे महाविद्यालय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित आहे. तंत्रशिक्षण संचालकांनी पूनमच्या स्थानांतरणास सहमती दर्शविली.(प्रतिनिधी)