"मनोज जरांगेंनी सरकारला एक मिनिटही वेळ देऊ नये", माजी आमदाराचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 05:37 PM2023-10-30T17:37:04+5:302023-10-30T17:41:43+5:30

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

dhule mla anil gote on maratha reservation manoj jarange patil protest  | "मनोज जरांगेंनी सरकारला एक मिनिटही वेळ देऊ नये", माजी आमदाराचे आवाहन

"मनोज जरांगेंनी सरकारला एक मिनिटही वेळ देऊ नये", माजी आमदाराचे आवाहन

आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसलेले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणावरून राज्यात जी काही आंदोलने व उपोषणे सुरू आहेत, त्याकडे आम्ही अतिशय गांभीर्याने पाहत आहोत. सरकारला मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे, कायद्याला, नियमाला धरून आरक्षण द्यायचे आहे. यामुळे आंदोलकांनी देखील सरकारची भूमिका समजून घेत सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

दुसरीकडे, धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला आता एक मिनिट देखील वेळ देऊ नये, असे आवाहन अनिल गोटे यांनी केले आहे. तसेच, हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात नॉन सिरिअस सरकार असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले. सध्याच्या राज्य सरकारची अवस्था ही सकाळी ओरडणाऱ्या कोंबड्यासारखी झाली आहे. कोंबडा फक्त ओरडतो, परंतु अंडे मात्र देत नाही, असे म्हणत राज्य सरकारवर अनिल गोटे यांनी निशाणा साधला आहे.

याचबरोबर, हे सरकार फक्त आणि फक्त घोषणा करणार सरकार असल्याचे म्हणत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार अशा घोषणा वारंवार या सरकारच्या मंत्र्यांकडून केल्या जात आहेत. यापूर्वी देखील मराठ्यांना आरक्षण या सरकारमधील मंत्र्यांनी दिले होते. परंतु मग सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकले का नाही, असा प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनिल गोटे यांनी टीका केली. तसेच, सदावर्त्तेंची मराठा समाजसंदर्भातील सध्याची वक्तव्यं बघता त्यांचा बोलवता धनी हे देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते पडळकर किंवा सदावर्ते यांनाच कुठल्याही प्रकारची वक्तव्यं करायला लावतात असा आरोपही त्यांनी केला. 

Web Title: dhule mla anil gote on maratha reservation manoj jarange patil protest 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.