ठाकरेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटल्यानंतर पवार म्हणतात, "मी या वादात पडणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 07:11 IST2023-02-20T06:05:39+5:302023-02-20T07:11:20+5:30
आयाेगाने दिलेल्या निकालाचा ‘धनुष्यबाण’ही सुप्रीम काेर्टात, शिंदे गटाने दाखल केले कॅव्हेट; ठाकरे गट लवकरच मागणार दाद

ठाकरेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटल्यानंतर पवार म्हणतात, "मी या वादात पडणार नाही"
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाचा खटला सुरू असताना आता निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालाचा सामनाही सुप्रीम कोर्टात रंगण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवसेनेने आयोगाच्या निकालाविरोधात कोर्टात दाद मागण्याची तयारी सुरू केली असून, त्याआधीच शिंदे गटाच्या वतीने कॅव्हेट दाखल केले आहे.
ठाकरे गटाकडून उद्या, सोमवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. शिंदे गटाकडूनही तातडीने हालचाल करीत शनिवारी सुप्रीम कोर्टात यावर कॅव्हेट दाखल करण्यात आले. आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय ठाकरे गटाच्या याचिकेवर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती शिंदे गटाने या कॅव्हेटच्या माध्यमातून केली आहे.
मंगळवारपासून काेर्टात सुनावणी
सत्तासंघर्षावर मंगळवारपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या खटल्याच्या गुणवत्तेच्या आधारे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ हे प्रकरण सात सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवते, की १६ आमदारांच्या अपात्रतेवर हेच खंडपीठ निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पुन्हा उठता येणार नाही, असे चीतपट केले
भाजपसोबत राहून युतीत आमची पंचवीस वर्षे सडली, असे विरोधक म्हणत होते. त्याच विरोधकांना दोन्ही काँग्रेसने रस्त्यावर आणले. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन आम्ही कोल्हापूरच्या भाषेत सांगायचे झाल्यास पुन्हा उठता येणार नाही, असे चीतपट केले. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
या वादात पडणार नाही : शरद पवार
सध्या जो काही धनुष्यबाण वाद सुरू आहे, यामध्ये मी पडणार नाही. यावर मी स्पष्टपणे सांगितले आहे अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तर निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जावे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
ठाकरे गटाकडून मशाल चिन्हही जाणार?
उद्धव ठाकरे जे मशाल चिन्ह घेऊन निवडणुकींना सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत ते मशाल चिन्हही आता त्यांच्याकडून हिरावले जाण्याची शक्यता आहे. कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंतच हे चिन्ह असेल असे आयोगाचे म्हटले असताना आता या ‘मशाल’ चिन्हावर समता पार्टीनेही दावा केला आहे. मशाल चिन्हाबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोत, असे समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी म्हटले आहे.