धनगर समाजाचा ‘चक्काजाम’
By Admin | Updated: August 15, 2014 02:55 IST2014-08-15T02:55:29+5:302014-08-15T02:55:29+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी गुरूवारी झालेल्या चक्काजाम आंदोलनाला बारामतीमध्ये हिंसक वळण

धनगर समाजाचा ‘चक्काजाम’
मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी गुरूवारी झालेल्या चक्काजाम आंदोलनाला बारामतीमध्ये हिंसक वळण लागले़ आंदोलकांनी दुकानांवर व ११ एसटी बसेसवर दगडफेक केली़ सायंकाळनंतर परिस्थिती निवळली असली तरी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे़ हिंगोलीच्या वसमतमध्येआणि सातारा जिल्ह्यात फलटणमध्येएस. टी. बसेस फोडण्यात आल्या.
दगडफेकीत तिघेजण जखमी झाले. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर आंदोलकांनी अबीर (बुक्का) ओतल्याने तणाव निर्माण झाला होता. अबीर ओतणाऱ्या मारुती जानकर यांना शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले़ याला राष्ट्रीय समाजपक्षाने पाठिंबा दिला होता. बारामतीमध्ये या पक्षाचे कार्यकर्ते मेंंढ्यांसह आंदोलनात उतरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर निदर्शने करण्यात आली़ धनगर समाज आरक्षण कृती समितीने नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात रस्ता रोको केला़ यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी अनेकांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली. हिंगोलीत महामार्गावर सुमारे अर्धा तास पाठलाग करुन पोलिसांनी आंदोलकांना हुसकावून लावले. (लोकमत न्यूज नेटवर्क)