Ajit Pawar Dhananjay Munde News: मुंडे विरुद्ध इतर सर्व आमदार असे राजकीय चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झाल्याचे दिसत आहे. अशात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडेंनी गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक वातावरणाचा उल्लेख करत अजित पवारांकडे काही मागण्या केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या गुरूवारी (३० जानेवारी )झालेल्या बैठकीनंतर याबद्दलची माहिती दिली.
धनंजय मुंडे म्हणाले, "बीड जिल्हा पोलीस दलास आवश्यक ७३ नवीन वाहने, ११३ मोटार सायकल या बाबी नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात आल्या. अशी अनेक सकारात्मक कामे करताना सर्व तालुक्यांना समान निधी देण्याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली. ऐकीव आणि अर्धवट माहितीच्या आधारे नियोजन समितीच्या कामकाजावर मागील काही दिवसात करण्यात आलेल्या निराधार आरोपांना पुरावण्यांसह खोडून काढण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून केले जाईल", असे मुंडे बैठकीत म्हणाले.
प्रशासनात उभी फूट पडलीये, अजित पवारांसमोर मांडला मुद्दा
धनंजय मुंडे बैठकीत म्हणाले, "बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून जातीयवादाचे विष काही लोकांकडून जाणीवपूर्वक पेरले जात आहे. याचा परिणाम जनतेपासून ते अगदी प्रशासनावर सुध्दा झालेला दिसून येत असून, जिल्हा प्रशासनात सुध्दा उभी फूट पडली आहे, हे नाकारता येणार नाही."
"कोण कधी कुठल्या अधिकाऱ्याचे नाव आणि जात काढून काय आरोप करतील ते सांगता येत नाही, त्यामुळे शिपाई ते जिल्हाधिकारी सर्वच अधिकारी - कर्मचारी यांच्यावरती भीती व दडपणाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आपल्या पदांना व कामांना हे अधिकारी कसा न्याय देऊ शकतील? त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांची एक विशिष्ट रणनीती ठरवून त्यांना भयमुक्त वातावरण तयार करून देण्याबाबत तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे", अशी मागणी धनंजय मुंडे यांनी बैठकीत केली.
मीडिया ट्रायल चालवून बीडची बदनामी
"दरम्यान काही अफवा पसरवून, अर्धवट माहितीच्या आधारे मीडिया ट्रायल चालवून बीड जिल्ह्याची नको ती प्रतिमा बाहेर प्रसिद्ध केली जात असून, सबंध जिल्ह्याची नाहक बदनामी होत आहे. सामाजिक सलोखा अबाधित रहावा तसेच जिल्ह्याची बदनामी थांबावी, याबाबतही ठोस उपाययोजना करण्यात याव्यात", अशी मागणी अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी केली.