Dhamapur Lake has the status of ‘World Heritage Irrigation Site’; Maharashtra's global honor | धामापूर तलावाला ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’चा दर्जा; महाराष्ट्राचा जागतिक सन्मान 

धामापूर तलावाला ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’चा दर्जा; महाराष्ट्राचा जागतिक सन्मान 

चौके (जि. सिंधुदुर्ग) : धामापूर (ता. मालवण) येथील तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटने पुरस्कृत केले गेले आहे. आतापर्यंत तेलंगणातील दोन साईट्सना ही जागतिक ओळख मिळाली होती. यंदा आंध्र प्रदेशमधल्या तीन साईट्स आणि महाराष्ट्रातील धामापूर तलावाला प्रथमच हा जागतिक सन्मान मिळाला आहे. 

जगातील  ७४ हेरिटेज इरिगेशन साईटस्मध्ये जपानमधील ३५, पाकिस्तानमधील  १ व श्रीलंका येथील २ साईट्स यांना हा जागतिक सन्मान आतापर्यंत  मिळाला आहे.   दिल्ली येथील सेंट्रल वॉटर कमिशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्यमंतक संस्थेचे संस्थापक सचिन देसाई यांना दूरध्वनी आणि ईमेलद्वारे  तलावाबद्दलच्या या सन्मानाची माहिती दिली.  स्यमंतक संस्थेतर्फे धामापूर तलावाचे तपशीलवार डॉक्युमेंटेशन सेंट्रल वॉटर कमिशनला सादर केले गेले होते. सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे  ७१ व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये धामापूर तलावाला हा सन्मान दिला जाईल.

‘मी धामापूर तलाव बोलत आहे’ ही डॉक्युमेंट्री रिलीज केली जाणार आहे. - सचिन देसाई, स्यमंतक संस्थेचे संस्थापक

पाच एकर परिसरात वसला तलाव
मालवण तालुक्यातील धामापूर हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी, माड-पोफळीची झाडे आहेत. दुतर्फा डोंगराच्याच मधोमध हा ऐतिहासिक तलाव आहे. या तलावाच्या काठावर श्री भगवतीचे प्राचीन देवालय आहे.
पाच एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण तलावाचा जलाशय अत्यंत नितळ आणि स्वच्छ असून नौकाविहार उपलब्ध आहे.

महाराष्ट्रातील पहिला तलाव

  • २०१८ मध्ये कॅनडा येथे झालेल्या ६९व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये भारताला पहिल्यांदा ‘सदरमट्ट आनीकट्ट’ आणि ‘पेड्डा चेरू’  या तेलंगणा राज्यातील दोन साईट्सना ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’  म्हणून पुरस्कृत केले गेले होते.  
  • २०२० च्या ७१व्या  सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे  होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये जगातील १४ साईट्सना ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’  म्हणून पुरस्कृत केले जाणार आहे. 
  • यापैकी भारतात आंध्र प्रदेशमधील ‘कुंबम तलाव’ (सन १७०६), ‘के. सी. कॅनल’ (सन १८६३) , ‘पोरुममीला टँक’  (सन १८९६) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धामापूर तलाव (सन १५३०) यांना हा मान प्राप्त होणार आहे. 
     

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dhamapur Lake has the status of ‘World Heritage Irrigation Site’; Maharashtra's global honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.