देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट; शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:25 IST2025-07-23T12:25:02+5:302025-07-23T12:25:16+5:30
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक कॉफीटेबल बुक तयार केले असून, त्यात शरद पवार यांनी फडणवीस यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट; शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत, हा प्रश्न मलाही पडतो. ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. त्यांच्या कार्याची गती अफाट आहे हे नाकारता येणार नाही, असे कौतुक ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी एका लेखात केले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक कॉफीटेबल बुक तयार केले असून, त्यात शरद पवार यांनी फडणवीस यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्याचे प्रकाशन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवारी राजभवन येथे करण्यात आले.
शरद पवार यांनी लेखात म्हटले, दोन विभिन्न विचारधारेचे प्रवाह समांतर वाहत असताना त्यांनी एकमेकांविषयी काय बोलावे? बोलायचेच म्हटले तर दोन्ही प्रवाहांची गती सारखी हवी. मी माझा वेग अजूनही अबाधित ठेवला आहे आणि फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट आहे. त्यांच्या कामाचा झपाटा पाहिला की मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. फडणवीस यांची ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत राहो असे अभीष्टचिंतन करतो.
देवेंद्रजी हुशार, प्रामाणिक राजकारणी आहेत. अभ्यासू, मुत्सद्दी स्वभावाने सर्व आव्हानांचा त्यांनी यशस्वीपणे सामना केला. भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात यश मिळो, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे कौतुक केले.
राष्ट्रपती, पंतप्रधान यांनीही दिल्या शुभेच्छा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे, आदींनी वाढदिवसानिमित्त फोन करून फडणवीस यांचे अभीष्टचिंतन केले.
शिंदेंच्या आगळ्या शुभेच्छा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांना काव्यमय शुभेच्छा दिल्या. विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे, महाराष्ट्राच्या उद्धाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे’.., महाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा! असे ते एक्सवर म्हणाले.