Devendra Fadnavis: "पोलखोल यात्रेच्या बसवर दगडफेक होणे अपेक्षितच, पण...", देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 14:01 IST2022-04-19T14:01:38+5:302022-04-19T14:01:54+5:30
Devendra Fadnavis: भाजपने आयोजित केलेल्या पोलखोल सभेच्या स्टेजची आणि रथाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis: "पोलखोल यात्रेच्या बसवर दगडफेक होणे अपेक्षितच, पण...", देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. यातच भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीविरोधात आज पोलखोल सभेचे आयोजन केले होते. पण, त्यापूर्वीच शिवसैनिकांनी राडा घालत पोलखोल सभेच्या स्टेजची आणि रथाची तोडफोड केली. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे.
भाजपाने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात पोलखोल यात्रेची सुरुवात केली. पण, सोमवारी(18 एप्रिल) या पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक झाली. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या पोलखोल यात्रेच्या बसवर दगडफेक होणे अपेक्षितच आहे. सत्ताधाऱ्यांचा बुरखा फाटून, यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होतेय. पहिल्याच सभेनंतर हे सगळे हादरले आहेत, त्यातूनच ते अशाप्रकारचे प्रयत्न करत आहेत. पण, त्यांनी काहीही केले तरी ही यात्रा थांबणार नाही, आम्ही यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करू," असा इशारा फडणवीसांनी दिला.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपने कांदिवली येथे सभेचे आयोजन केले आहे. कांदिवली पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर संध्याकाळी 7 वाजता ही सभा होणार आहे. त्यासाठी मध्यरात्रीपासूनच स्टेज बांधण्याचे काम सुरू होते. मात्र, रात्री एकच्या सुमारास मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले आणि सभेच्या स्टेजसह रथाची तोडफोड केली. शिवसेना शाखाप्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी ही तोडफोड केली, तसेच शिवसेना झिंदाबादच्या घोषणाही दिल्या.