मुंबई - भाजपा महायुतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री असून महाराष्ट्रातील सर्व निर्णय हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच घेतात त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात', असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्षन सपकाळ यांनी लगावला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे मोठे स्कँडल पुराव्यासह उघड केले आहे. भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करत असून हा विषय एकट्या काँग्रेस पक्षापुरता मर्यादीत नसून तो सर्वांचा आहे. राहुल गांधी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देत असून या लढ्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, असे आवाहनही हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
देशतील काही निवृत्त अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पत्र लिहिल्याच्या मुद्द्यावर नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, गली गली में शोर है, निवडणूक आयोग चोर है, हे आता सर्वांना समजले आहे. हा विषय केवळ एका काँग्रेस पक्षाचा नाही तर सर्वांचाच आहे, नागरिकांचा आहे, मीडियाचा आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या या लढाईत सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असे सपकाळ म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली, त्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा महायुतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री असून महाराष्ट्रातील सर्व निर्णय हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच घेतात त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दोन दिवसापूर्वीच अमित शाह यांना भेटले होतो त्यानंतर पार्थ पवार यांना पुण्यातील जमीन घोटाळ्यातून क्लिन चिट देण्यात आली. गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत टोळी युद्ध सुरु आहे आणि त्यातून नेहमी दिल्लीत जावे लागते, असेही सपकाळ म्हणाले.
मनसेसोबत आघाडी वा युती करण्यासाठी मुंबई वा महाराष्ट्रातून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आघाडी करण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे, त्याचा आदर पक्षाने राखला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. इंडिया आघाडी बाहेरचा पक्ष आघाडीत येणार असेल तर तसा प्रस्ताव सादर करावा त्यावर राष्ट्रीय पातळीवर निर्णय होईल. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणे ठरवण्याचा अधिकार आहे, त्यांनी कोणाशी युती करावी हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असेही सपकाळ म्हणाले..
मनसेच्या आरोपाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मराठी हा अस्मितेचा मुद्दा आहे, तो जोपासण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. मराठी हा केवळ भाषेपुरता विषय नसून मराठी हा महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्र धर्म काँग्रेसला कोणी शिकवण्याची गरज नाही. इयत्ता पहिल्यापासून हिंदी सक्ती करण्याचा मुद्दा पुढे आला त्यावेळी सर्वात आधी काँग्रेसने विरोध केला होता, याचे स्मरण यानिमित्ताने करुन देत आहोत असेही सपकाळ म्हणाले.
Web Summary : Congress accuses BJP of mortgaging Maharashtra's pride to Gujarat, claiming Amit Shah dictates decisions, rendering Fadnavis a shadow Chief Minister. Sapkal calls for unity to save democracy.
Web Summary : कांग्रेस का आरोप है कि भाजपा ने महाराष्ट्र का गौरव गुजरात के पास गिरवी रख दिया है। अमित शाह फैसले लेते हैं, फडणवीस छाया मुख्यमंत्री हैं। सपकाल ने लोकतंत्र बचाने के लिए एकता का आह्वान किया।