"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:38 IST2025-12-15T17:37:50+5:302025-12-15T17:38:20+5:30
CM Devendra Fadnavis on Municipal Corporation Elections 2026 Dates: मुंबईसह सर्व महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ला निकाल

"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
CM Devendra Fadnavis on Municipal Corporation Elections 2026 Dates: राज्य निवडणूक आयोगाने आज आगामी महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यातील सर्व २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळामुळे त्या याद्या स्वच्छ होत नाहीत तोवर निवडणुका नकोत, असे विरोधी पक्षाच्या नेतेमंडळींनी म्हटले होते. पण अखेर आज आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांना सुनावले.
जनता आम्हाला पुन्हा शहर विकासाची संधी देईल
"राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा घोषित केल्याबद्दल मला खूप आनंद आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कारण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे कारभार प्रशासकाच्या मार्फत चालवणे हे लोकशाहीला अभिप्रेत नव्हते. न्यायालयाच्या निर्णयामुळे दीर्घकाळ या संस्था निर्माण चित प्रतिनिधींच्या विना होत्या. आता पुन्हा या निवडणुका होत आहेत. आम्हाला विश्वास आहे की आमच्या शासनाने केलेले काम पाहता पुन्हा लोक आमच्याच बाजूने कौल देतील. जनता आम्हाला पुन्हा शहर विकासाची संधी देईल," असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
जिथे महायुती नसेल तिथे काय?
"आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करत आहोत. अनेक ठिकाणी भाजप शिवसेना युती होईल. काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी युतीही होताना दिसेल. मात्र जिथे युती नसेल तेथे आम्ही मैत्रीपूर्ण पद्धतीने लढत देऊ. यात कुठेही कटूता नसेल," असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
निवडणुका वेळेवरच व्हाव्यात!
"मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे आम्ही देखील दाखवले आहे, पण त्याकरता निवडणुका घ्यायच्या नाहीत असे करता येणार नाही. गेले २०-२५ वर्षे जे लोक निवडणुका लढवत आहेत, त्यांना माहिती आहे कमी अधिक प्रमाणात मतदार यादीमध्ये घोळ असतोच. पण सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे करा अशी ओरड करणे योग्य नाही. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत. त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे. म्हणून आमची मागणे आहे की निवडणुका वेळेवरच व्हाव्यात," असे ते म्हणाले.