'उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीला उशीर का केला, तर...'; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 20:34 IST2025-03-05T20:32:00+5:302025-03-05T20:34:06+5:30
संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी सुरूवातीपासून केली जात होती. अडीच महिन्यांनी त्यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीतील अडथळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.

'उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीला उशीर का केला, तर...'; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला नियम
Devendra Fadnavis Ujjwal Nikam: संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती करण्यासाठी सरकारने इतका वेळ का लावला? असा प्रश्न त्यांच्या नियुक्तीनंतर विरोधकांकडून उपस्थित केला गेला. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी नियुक्तीमध्ये कोणता अडथळा होता, हेही सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्य सरकारकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणातउज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून २५ फेब्रुवारी रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
उज्ज्वल निकमांची नियुक्ती, फडणवीस काय बोलले?
मुख्यमंत्री फडणवीस एका मुलाखतीत बोलताना म्हणाले की, "उज्ज्वल निकम आमच्या देशातील सर्वात मोठे फौजदारी वकील आहेत. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी होकार दिला."
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, "त्यानंतर आम्ही उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यास उशीर का केला, तर खटला चालवण्याच्या नियमानुसार खटल्याचा वकील हा, आरोपपत्रासाठी मदत करू शकत नाही. त्यामुळे ज्यादिवशी आरोपपत्र दाखल करण्यात आले, त्याच दिवशी आपण त्यांची नियुक्ती करू शकतो."
लोक दररोज आमच्यावर आरोप करताहेत -फडणवीस
हाच धागा पकडत त्यांनी सांगितले, "नाहीतर तांत्रिकदृष्ट्या जे गुन्हेगार असतात. त्यांना यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की, खटल्यातील वकिलाने आरोपपत्रात हस्तक्षेप केला, तर हा खटला उभा राहू शकत नाही. हे लोकांना समजत नाही. लोक दररोज आमच्यावर आरोप करताहेत. तुम्ही त्यांची नियुक्ती का केली नाही. त्यांची नियुक्ती उशिरा का केली?", असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबद्दल बोलताना दिले.