महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून महायुतीत सुरु असलेली रस्सीखेच बुधवारी संपुष्टात आली खरी परंतू काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हे आज दुपारपर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. अखेर शिवसेनेच्या आमदारांनी शिंदेंची भेट घेत त्यांची यशस्वी समजूत काढली आहे. यामुळे महायुतीचे तिन्ही नेते आज शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचा कार्यक्रम होणाऱ्या आझाद मैदानावर तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या शपथविधीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे जरी येणार नसले तरी राज्यभरातून कार्यकर्ते जाणार आहे. महनीय व्यक्तींना निमंत्रण पत्रिकाही पोहोचल्या आहेत. या शपथविधी सोहळ्याच्या मंडपाची पहिली झलक समोर आली आहे.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळच उपस्थित राहणार आहेत. तिघांचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच ते निघणार आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे मोदी यांच्याकडे जास्त वेळ नसल्याने मंत्रिमंडळाचा शपथ सोहळा आज होणार नाही.
५ वर्षांनी ते पुन्हा आले!देवेंद्र फडणवीस हे राज्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. २०१४ साली फडणवीसांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा भव्यदिव्य सोहळा पार पडला होता. २०१४ ते २०१९ सलग ५ वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले होते. २०१९ च्या निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली. त्या राजकीय घडामोडीत अजित पवारांनासोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. परंतु अवघ्या ७२ तासांत त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. २०१९ मध्ये फडणवीसांनी निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन, याच भूमिकेत, याच निर्धाराने अशी घोषणा केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या खेळीमुळे फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदी बसावं लागले. त्यानंतरच्या काळात विरोधकांनी मी पुन्हा येईन घोषणेवरून फडणवीसांची खिल्ली उडवली परंतु आज ५ वर्षांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले आहेत.