मुंबई - मागील १० दिवसांपासून रखडलेला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अखेर आज आझाद मैदानावर पार पडत आहे. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे या सरकारमध्ये राहणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता त्यावर आता नवी माहिती समोर आली आहे. राज्याचे विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे आज आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच एकनाथ शिंदे, अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. शिवसेना आमदारांनीही एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये राहण्याचा आग्रह धरला होता. एकनाथ शिंदेंकडून कुठलीही भूमिका जाहीर झाली नव्हती. परंतु शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली आहे. बुधवारी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यावर शिक्कामोर्तब झाले.
शपथविधीच्या एक दिवस आधी राजकीय घडामोडींना वेग आला होता. सकाळी फडणवीसांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते आणि घटक पक्षाचे नेते राजभवनावर पोहचले. याठिकाणी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची भेट घेत महायुतीने सत्तास्थापनेचा दावा सांगितला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यात देवेंद्र फडणवीसांनी ५ डिसेंबरच्या शपथविधीबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानात संध्याकाळी ५.३० वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. रात्री उशिरापर्यंत कोण कोण शपथ घेईल त्याबाबत कळवलं जाईल. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहावं अशी आमची इच्छा आहे. ते नक्कीच आमच्यासोबत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
...अजितदादांच्या विधानावर सगळेच हसले
एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. बुधवारी राज्यपालांकडे त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पाठिंबा पत्र दिले. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की, तु्म्ही या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री असणार की नाही. तेव्हा शिंदे म्हणाले की, संध्याकाळपर्यंत धीर धरा. मी किंवा अजितदादा उद्या शपथ घेणार आहोत की नाही, याबाबत लवकरच कळेल. शिंदे यांचे हे वाक्य संपताच अजित दादा म्हणाले की, त्यांचे माहिती नाही पण मी उद्या नक्कीच शपथ घेणार आहे. मी थांबणार नाही असं विधान करताच पत्रकार परिषदेत जोरदार हशा पिकला.