"अरे वेड्या, फडणवीसांनी पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी वेळ मागितली, पण..."; रामदास कदम उद्धव ठाकरेंवर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:14 IST2025-01-24T12:11:55+5:302025-01-24T12:14:52+5:30

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांना डिवचले. त्यांच्या टीकेला रामदास कदम यांनी उत्तर दिले. 

Devendra Fadnavis asked for time to come to Matoshree five times; Ramdas Kadam lashed out at Uddhav Thackeray | "अरे वेड्या, फडणवीसांनी पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी वेळ मागितली, पण..."; रामदास कदम उद्धव ठाकरेंवर बरसले

"अरे वेड्या, फडणवीसांनी पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी वेळ मागितली, पण..."; रामदास कदम उद्धव ठाकरेंवर बरसले

Shinde Thackeray News: राज्यात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे असा राजकीय संग्राम सुरू झाला आहे. शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाराजीच्या मुद्द्यांवरून डिवचलं. ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केल्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पलटवार केला. 'उद्धव ठाकरेंना एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे', असे म्हणत कदमांनी ठाकरेंवर हल्ला चढवला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एका मुलाखतीत बोलताना रामदास कदम म्हणाले, "नियतीने त्यांना धडा शिकवला. ९० उमेदवार उभे केले होते. फक्त २० आमदार निवडून आले. ते देखील राहतील की नाही, अशी शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांना वैफल्य आलेलं आहे. वैफल्यामधून त्यांची बडबड सुरू आहे, असं म्हटलं तर चुकीचं वाटणार नाही."

तुम्ही लंडनला कशासाठी जाता? कदमांचा ठाकरेंना सवाल

"त्यांनी (उद्धव ठाकरे) एकनाथ शिंदेंना असं म्हटलं आहे की, 'रुसू बाई रुसू आणि गावात जाऊन बसू.' एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा आहेत. गावात शेती आहे. शेती करण्यासाठी जातात, हे सगळ्यांना माहिती आहे. पण, उद्धवजी, आपण लंडनला कशासाठी जाता? महाराष्ट्रात मिठाईचे खोके गोळा करून घेऊ आणि लंडनमध्ये जाऊन बसू असं काही आहे का आपलं? तुमचं काय आहे, ते बघा?", असा उलट सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला.  

"शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने ८० उमेदवार उभे केले, ६० आमदार निवडून आणले. यांनी (उद्धव ठाकरे) आता शिंदेंवर बोलणं थांबवायला हवं. त्यांनी स्वतःचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला कल्पना आहे की, शिवसेनाप्रमुखांनी शेवटपर्यंत कुठलंही पद घेतलं नाही. त्यांनी रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवला. उद्धव ठाकरे एवढे स्वार्थी आहेत, त्यांना मुख्यमंत्रि‍पदावर बसायचं होतं. त्यांना वर्षा बंगल्यावर जायची घाई होती म्हणून शिवसेना फुटली", अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'उद्धवजी, मला मातोश्रीवर यायचं आहे'

"उद्धव ठाकरेंच्या कालच्या (२३ जानेवारी) सभेत किती खुर्च्या खाली होत्या. समोर खुर्च्या खाली असताना हा उद्धव ठाकरे वेड्यासारखं काय बडबडतोय? हा वाटेल ते बडबडतोय. हा अमित शाह यांच्यावर बोलतोय. अरे वेड्या, देवेंद्र फडणवीसांनी पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी वेळ मागितली होती. 'उद्धवजी, मला मातोश्रीवर यायचं आहे.' हे म्हणाले, नाही. माझे दरवाजे तुमच्यासाठी बंद. अरे तुमचे दरवाजे बंद केले. मग आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर लाचारासारखा पुप्षगुच्छ घेऊन भेटायला कशाला गेला होता? लाज गुंडाळली का? शिवसेनाप्रमुखांचे चिरंजीव आहात, त्याची थोडी जनाची नाही, तर मनाची ठेवायला पाहिजे", अशी टीका रामदास कदम यांनी केली.

Web Title: Devendra Fadnavis asked for time to come to Matoshree five times; Ramdas Kadam lashed out at Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.