विकासकामे कागदावरच : निधी मिळूनही खर्चाबाबत अनास्था, राज्यात ३८ टक्केच निधी खर्च!
By अतुल कुलकर्णी | Updated: January 23, 2018 03:49 IST2018-01-23T03:48:54+5:302018-01-23T03:49:07+5:30
राज्याच्या अर्थसंकल्पाला २० टक्के कट लावून जेवढे पैसे वित्त विभागाकडून मिळाले तेदेखील पूर्णपणे खर्च करण्यात अनेक विभागांना अपयश आले आहे. परिणामी, राज्याच्या विकास योजना कागदावरच राहिल्या आहेत.

विकासकामे कागदावरच : निधी मिळूनही खर्चाबाबत अनास्था, राज्यात ३८ टक्केच निधी खर्च!
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पाला २० टक्के कट लावून जेवढे पैसे वित्त विभागाकडून मिळाले तेदेखील पूर्णपणे खर्च करण्यात अनेक विभागांना अपयश आले आहे. परिणामी, राज्याच्या विकास योजना कागदावरच राहिल्या आहेत.
आर्थिक वर्ष संपण्यास फक्त दोन महिने शिल्लक असताना पाच प्रमुख विभागांनी अद्याप १० टक्के निधीदेखील खर्च केलेला नाही.
जलसंपदा विभागाला सर्वाधिक १०,५३२.३०३ कोटी म्हणजे ७६.५३ टक्के निधी मिळाला असताना, या विभागाने १३३२.८२० म्हणजे फक्त ९.६८ टक्केच निधी खर्च केला आहे.
राज्यात सर्वत्र खड्डेच खड्डे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मिळालेल्या ११०३७.४८५ कोटी म्हणजे ७१.९६ टक्के
निधीपैकी फक्त १२८८.७२३ कोटी म्हणजे ८.४० टक्केच निधी खर्च केला आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. येणा-या वर्षात कोणत्या विभागाच्या मागण्या काय आहेत याचा आढावा घेण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून वित्तविभागाने सुरू केले आहे. त्या वेळी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्याचे एकूण बजेट ३,६९,१८५.३१३ कोटी रुपयांचे होते. त्यापैकी २,२७,१०२.८५५ कोटी रुपये वित्तविभागाने त्या त्या विभागांना वर्ग केले. मात्र त्यापैकी आजच्या तारखेपर्यंत फक्त १,४०,६३९.८८ कोटी खर्च झाले आहेत. याचा अर्थ एकूण बजेटच्या फक्त ३८.०९४ टक्केच निधी खर्च झाला आहे.
ज्या विभागांनी निधी देऊनही खर्च केलेला नाही, त्यांचा तातडीने आढावा घेतला जाईल. गेल्या दोन दिवसांपासून आपण रोज चार ते पाच विभागांचा आढावा घेतच आहोत. दिलेला निधी विकासकामांसाठी आहे त्यामुळे तो खर्च झाला नाही, तर त्याची कारणे शोधली जातील व संबंधित मंत्र्यांना त्याबद्दल विचारणा केली जाईल.
- सुधीर मुनगंटीवार, वित्त मंत्री
तुम्हाला आमच्यापेक्षा लवकर माहिती मिळते. तरीपण अधिक माहिती घेऊन सांगतो. आमच्याकडे पंतप्रधान आवास योजनेसाठी निधी आला; पण प्रकल्पांना मंजुरीच मिळाली नाही. त्यामुळे निधी खर्च झाला नाही.
- प्रकाश मेहता,
गृहनिर्माण मंत्री
आम्हाला विकासकामासाठी ४७५८ कोटी मिळाले. त्यापैकी १९९८ कोटी खर्च झाले आहेत. उद्या आपण विभागाची आढावा बैठक घेणार आहोत. आम्ही खड्डे बुजवण्यासाठी जवळपास १६०० कोटी खर्च केले आहेत.
- चंद्रकांत पाटील,
बांधकाम मंत्री
आम्ही महामंडळनिहाय खर्च करतो. त्यामुळे आमचा खर्च बिम्स प्रणालीवर दिसत नाही. आम्हाला १०,५३२.३२ कोटी मिळाले होते. त्यापैकी आम्ही ८५५९.६४ कोटी खर्च केले आहेत.
- गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
एवढे पैसे आमच्या विभागाला दिले हे मी पहिल्यांदाच ऐकले. आम्ही नमामि चंद्रभागेसाठी निधी दिला; व १५ कोटींची टेंडर येत्या आठ दिवसांत निघतील. आम्हाला बजेटमध्ये खूप पैसे सांगतात, मिळत मात्र काहीच नाही.
- रामदास कदम, पर्यावरण मंत्री