विकासाचे ‘ग्लोबल’ मॉडेल राबवू!--आमचा पक्ष आमची भूमिका

By Admin | Updated: October 10, 2015 00:19 IST2015-10-10T00:01:18+5:302015-10-10T00:19:24+5:30

‘लोकमत’शी थेट संवाद : भाजप-ताराराणी आघाडीला किमान ४५ जागा, महापौर भाजपचाच! : चंद्रकांतदादा

Developing the 'Global' model of development! - Our role is our role | विकासाचे ‘ग्लोबल’ मॉडेल राबवू!--आमचा पक्ष आमची भूमिका

विकासाचे ‘ग्लोबल’ मॉडेल राबवू!--आमचा पक्ष आमची भूमिका

कोल्हापूर : कोल्हापूरात विकासाचे ग्लोबल मॉडेल राबवू. कचरा, सांडपाणी ही सध्या कोल्हापूरची डोकेदुखी बनली आहे; परंतु तेच प्रश्न उद्याच्या कोल्हापूरचे उत्पन्नाचे मार्ग होतील, असे नियोजन आम्ही केले आहे. राज्यात दिले तसे स्वच्छ प्रशासन महापालिकेतही देऊ. आम्ही आतापर्यंत तीन सर्व्हे केले असून त्यांमध्ये भाजप-ताराराणी आघाडीच्या कमीत कमी ४५ व जास्तीत जास्त ५५ जागा निवडून येतील, असा ठाम विश्वास आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौर भाजपचाच असेल, असाही दावा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. शुक्रवारी दुपारी त्यांनी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास भेट दिली व निवडणूक लढविण्यामागील भूमिका व विकासाचे नियोजन विस्ताराने सांगितले. आमच्याकडे शहरविकासाचे चांगले नियोजन आहे. सोबतीला राज्य व केंद्र सरकारची सत्ता आहे. लोकांनी आतापर्यंत काँग्रेसवाल्यांना संधी दिली. आता एकदा आमच्याकडे सत्ता द्या. आम्ही नक्कीच या शहराचे रूप बदलून दाखवू, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.पाटील म्हणाले,‘ कोल्हापुरात सध्या घनकचरा व सांडपाणी या लायबिलिटीज बनल्या आहेत. त्यांचे काय करायचे याचा विचार करण्यासाठी आम्ही महिनाभर चांगला कन्सल्टंट आणून ठेवला. त्यांनी काही चांगले प्रकल्प सुचविले आहेत. सांडपाण्याचा पुनर्वापर शेती व वीज निर्मितीसाठी करता येणे शक्य आहे. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प नागपूर महापालिकेने राबविला आहे. त्यांना त्यापासून २५ कोटी रुपये मिळतात. सुमारे दीडशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प ‘बीओटी’ तत्त्वावर असेल. त्यातून तयार होणारी वीज ‘महावितरण’ला विकता येईल. ती शहरातील स्ट्रीट लाईटसाठीही वापरता येईल. बंगलोरला वामन आचार्य म्हणून एक उद्योजक आहेत. ते औद्योगिक कचऱ्यापासून पांढरा कोळसा तयार करतात. असा कोळसा तयार करणारी मशिनरी आपल्या शिरोली औद्योगिक वसाहतीत तयार होते. गुजरातने सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. घरफाळा वाढविणे हेच एकमेव उत्पन्नाचे साधन असता कामा नये. त्यासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढवावे लागतील. महापालिकेची कर्जे जास्त व्याजदराने असतील, तर अन्य वित्तीय संस्थांकडून कमी व्याजदराची कर्जे उपलब्ध करून व्याजाचा भुर्दंड कमी करण्याचा विचार केला आहे.’
नागपूरला इथेनॉलवर बसेस चालविल्या जातात. कोल्हापुरातही तसाच प्रयत्न केला जाईल. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बहुमजली पार्किंग व्यवस्था केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
नगरसेवकांवर बंधने आणू...
चांगले अधिकारी व चांगले कंत्राटदार असल्याशिवाय विकास होणार नाही; परंतु त्यांना नगरसेवक त्रास देतात म्हणून येथे काम करायला कोणी तयार नाही. आम्ही असे घडू देणार नाही. जो नगरसेवक म्हणून निवडून येईल त्याला स्वत:चे चार कर्मचारी नियुक्त करावे लागतील. स्वच्छता, वीज, प्लंबिंग, ड्रेनेजची कामे करण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा वापर करता येईल. त्यांचा पगार नगरसेवकाने स्वत: द्यायचा आहे. एखाद्या नगरसेवकाची आर्थिक स्थिती नसेल तर त्यास पक्षाकडून ही व्यवस्था करून देऊ.
स्वीकृत नगरसेवक वर्षासाठी
आताचे नगरसेवक म्हटल्यावर ते रस्ते व गटारीच्या पुढे जात नाहीत. बापूसाहेब मोहिते, शरद सामंत, सुनील मोदी अशी काही नावे सोडल्यास विकासाचा दृष्टिकोन असलेल्या लोकांची उणीव सभागृहात जाणवते. यासाठी आम्ही वर्षाला एका तज्ज्ञ माणसाला स्वीकृत नगरसेवक म्हणून घेऊ. पाच वर्षांत असे पाच स्वीकृत नगरसेवक असतील. ते पूर्णत: अराजकीय असतील. समाजातील फीडबॅक त्यांच्याकडून मिळू शकेल.
रुग्णालये, नाट्यगृहे उभारणार
सध्या उपनगरांत चांगले नाट्यगृह नाही, चांगले रुग्णालय नाही, चांगली उद्याने नाहीत. त्यासाठी चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा देणारे महापालिकेचे रुग्णालय आम्ही उभारू. मुलांना खेळता येतील अशी उद्याने विकसित करू. चांगले नाट्यगृह उभारण्याची योजना आहे.
कोंडाळामुक्त शहर
कोल्हापूर हे कोंडाळामुक्त शहर करू. प्रत्येकाला घरात दोन बादल्या देऊ. त्यांनी ओला व सुका कचरा त्यामध्येच साठवावा. या कचऱ्याचा वापर करून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारू. त्याचा कॉलनीसाठी वापर करता येणे शक्य आहे.


कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली आहे. सर्वच पक्षांनी बहुतांश उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीत भाजप व ताराराणी आघाडी एकत्रित आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना स्वबळावर लढत आहेत. या पाचही पक्षांची कोल्हापूरच्या विकासाची ब्लू प्रिंट काय आहे, हे ‘लोकमत’ जाणून घेणार आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी सायंकाळी भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांचे शहर विकासाचे ‘व्हिजन’ जाणून घेतले. त्यांनी मांडलेली भूमिका...!


उपनगरांच्या विकासासाठी प्राधान्य
महापालिकेचे विभागीय कार्यालय उपनगरामध्ये स्थलांतरित केली जातील. आता उपनगरांच्या विकासाचे कोणतेही नियोजन महापालिकेकडे नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर विधिमंडळाचे अधिवेशन जसे नागपूरला घेतले जाते त्या धर्तीवर उपनगरांमध्येच सर्वसाधारण सभा घेऊ. यात उपनगरांच्या विकासावरच चर्चा होईल.

मिनी महापालिका
शहरविकासाच्या चांगल्या कल्पना खूप लोकांकडे असतात; परंतु त्यांना व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे शहरातील चांगले आर्किटेक्टस, डॉक्टर्स किंवा साहित्यिक अशा २० लोकांचे आम्ही एक मंडळ करू. हे मंडळ शहराच्या पुढील वीस वर्षांच्या विकासाचे नियोजन करील. महापालिका सभेच्या आदल्या दिवशी त्यांची बैठक होईल व ते नवनवीन कल्पना सभागृहाला सुचवतील. त्यातील सूचना योग्य असतील तर त्यास सभेत मंजुरी देऊन त्याची अंमलबजावणी करू.

Web Title: Developing the 'Global' model of development! - Our role is our role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.