‘महाराष्ट्राच्या प्रगतीखेरीज विकसित भारत अशक्य’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:10 IST2025-03-21T11:09:30+5:302025-03-21T11:10:37+5:30
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची झाल्याखेरीज विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी केले.

‘महाराष्ट्राच्या प्रगतीखेरीज विकसित भारत अशक्य’
मुंबई : महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची झाल्याखेरीज विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी केले. राजभवनवर झालेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याचे ते प्रमुख पाहुणे होते.
लोकमत हे महाराष्ट्रातील पहिलेच असे वृत्तपत्र आहे ज्यांनी इतका उत्तम पुरस्कार सोहळा राजभवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित केल्याचा आवर्जून उल्लेख करून राज्यपाल म्हणाले, नवी मुंबई विमानतळ व वाढवण बंदर हे दोन्ही प्रकल्प गेम चेंजर आहेत. यामुळे राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरच्या दिशेने जाईल. ‘लोकमत’ने राजकीय बातम्यांवर भर न देता तंत्रज्ञान, नवे प्रकल्प, त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी व विकास यावर लेखन करावे. सरकारने चूक केली तर टीका करण्याचा वृत्तपत्रांना अधिकार आहे. वृत्तपत्रांच्या पाठिंब्याखेरीज सरकारला विकासकामांसाठी प्रोत्साहन मिळणार नाही.
अभिजात दर्जाचे महत्त्व समजले नाही
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. परंतु, त्याचे महत्त्व बहुतेकांच्या लक्षात आलेले नाही, असे राधाकृष्णन म्हणाले. महाराष्ट्राच्या ३६ पैकी ३० जिल्ह्यांचा मी दौरा केला. या दौऱ्यात केवळ एका महिलेने येऊन मराठीला केंद्राने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आभार मानले. स्वामीनारायण संस्थेचे स्वामी ब्रह्मविहारी दास यांना पुरस्कार दिल्याचा धागा पकडून राधाकृष्णन म्हणाले की, तामिळनाडूत भगव्या रंगावरून बरीच चर्चा झाली. भगवा रंग हा कुठल्या विशिष्ट पक्ष, विचाराचा रंग नसून, त्यागाचा रंग आहे. राजभवन हे केवळ राज्यपालांपुरते सीमित न राहता जनतेचा आवाज बनावे यासाठी प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले.