Deputy CM Eknath Shinde: अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. राज्य सरकारने आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. यापैकी १ हजार ८२९ कोटी रुपये जिल्हास्तरावर वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री पूरग्रस्त भागाला भेटी देण्याबाबत बैठकीत ठरवण्यात आले. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पूरग्रस्त ठिकाणी जाऊन पाहणी केली.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या करंजा गावातील शिंदे व करळे वस्तीतील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन तेथील परिस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतली. मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आल्याने स्थानिक वाड्या वस्त्यांचे अतोनात नुकसान झाले असून, अनेक घरे माती चिखलाने भरून गेली आहेत. तसेच शेतीचे संपूर्ण नुकसान झाले असून शेतातील मातीदेखील वाहून गेली आहे. आज येथील ग्रामस्थांची व्यथा जाणून घेतली तसेच शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगून त्यांना आश्वस्त केले.
एक किलो धान्य कधी शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिले का?
शिवसेनेच्या वतीने दिल्या जात असलेल्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. ज्यांनी आरोप केले, त्यांनी एक किलो धान्य कधी शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिलय का? कार्यकर्त्याने त्या ठिकाणी मदत वाटप केले, तर त्या बॅगेत काय मदत साहित्य आहे, यावर लक्ष द्या. जे फोटोवर लक्ष देतात त्यांना राजकारण करायचे आहे, असे उत्तर देण्यात आले.
शेतकऱ्याच्या मागे उभे राहणे हे सरकारचे काम
शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूच नुकसान झाले आहे. म्हणून आता नदीकाठी जी गाव आहेत, गावातील जमिनी खरडून गेल्या आहेत. एकंदरीत प्रचंड मोठे नुकसान झालं आहे. ९८ हजार हेक्टर शेतीच नुकसान झालेले आहे. हे अस्मानी संकट आहे. शेतकऱ्याच्या मागे उभे राहणे हे सरकारचे काम आहे. सरकार यापूर्वी शेतकऱ्याच्या मागे उभ राहिले,आजही उभे आहे. तातडीची मदत तात्काळ देऊ. नंतर पंचनामे करुन जी मदत ठरवली ती देऊ. कारण नुकसान मोठे आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सरकारी निकष बाजूला ठेवून त्यांना भरीव मदत करावी लागेल
नदी पात्रात असलेल्या वाडीतील काही घरे अद्यापही पाण्याखाली असल्याचे काही ग्रामस्थांनी माझ्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तात्काळ बोटीने नदीपात्रात जाऊन या वाडीला भेट देऊन पाहणी केली. या वाडीवरील नागरिकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच या सीना नदीवर पूल उभारण्याची ग्रामस्थांची मागणी देखील मान्य केली जाईल असे याप्रसंगी सांगितले. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देताना सरकारी निकष बाजूला ठेवून त्यांना भरीव मदत करावी लागेल, असे माझ्या निदर्शनास आले. शासन त्यासाठी नक्की प्रयत्न करेल. तसेच शिवसेनेच्या वतीने त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. या मदतीसाठी खास १२ साहित्यांचे कीट तयार करण्यात आले आहे. हे कीट घेऊन १८ टेम्पो धाराशिवमध्ये दाखल झाले आहेत. या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. पूरग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या या किटमध्ये साधारण १२ दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. ही सर्व सामग्री पूरग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत मिळावी यासाठी देण्यात येत आहे.