“चेहरा भोळा, भानगडी सोळा, चेहऱ्यावर जाऊ नका, आम्ही इतकी वर्ष फसलो”; शिंदेंचा ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 22:32 IST2025-04-10T22:29:34+5:302025-04-10T22:32:09+5:30
Deputy CM Eknath Shinde News: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही बोललो ते सर्व देणार आहोत. फक्त थोडी परिस्थिती सुधारू द्या, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“चेहरा भोळा, भानगडी सोळा, चेहऱ्यावर जाऊ नका, आम्ही इतकी वर्ष फसलो”; शिंदेंचा ठाकरेंना टोला
Deputy CM Eknath Shinde News: खुर्च्या बदलल्या तरी दिल बदलले नाही. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही जे बोललो ते सर्व देणार आहोत. फक्त थोडी परिस्थिती सुधारू द्या. कर्जमाफी असो किंवा काही घोषणा, त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. त्यांनी फेसबुक live करुन फेक नरेटिव्ह पसरवले. ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
सांगोला येथे उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांचे कौतुक केले. सांगोल्याच्या लोकांचे प्रेम बघून एकदम ओके वाटत आहे. शहाजीबापू पडले असले तरी लोकांचे तुमच्यावर प्रेम आहे. एखाद्या मॅचमध्ये हरले म्हणून विराटची बॅट थंड पडत नाही. टायगर अभी जिंदा है. बापूंना मोकळे सोडणार नाही. बापू मोकळा ढाकळा माणूस आहे. आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा पहिल्या दिवसापासून शहाजी बापू माझ्या बाजूला खांद्याला खांदा लावून पहाडासारखा उभा होता. तेव्हा आम्ही सारे तणावात होते, पण बापू विनोद करुन वातावरण तणावमुक्त करायचे. गप्पा मारायचे. बापू सगळ्यांना हसवायचे. लोकांच्या सुख-दु:खात धावून जाणार आहे. आपल्या हातात काम घेतले तर ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
चेहरा भोळा, भानगडी सोळा, चेहऱ्यावर जाऊ नका, आम्ही इतकी वर्ष फसलो
आमची सगळी माणसे सरळ आणि साधी आहेत. काही छक्के-पंजे नाहीत. पण काही लोक दिसायला साधी असतात. दिसायला निष्पाप असतात. पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा अशी लोक असतात. त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका. आपण चेहऱ्यावर जाऊ नका. मी पण चेहऱ्यावर जावून इतके वर्ष फसलो, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला.
दरम्यान, आम्ही आज एक टीम म्हणून काम करतोय. टीम म्हणून राज्याला पुढे नेत आहोत. राज्याला नंबर एक करायचे आहे. मी पुन्हा एकदा सांगेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा-अकरा वर्षांपूर्वी देशाची विकासयात्रा सुरू केली. खऱ्या अर्थाने देशाचा विकास होताना पाहत आहोत. देशाचा डंका जगभरात पिटताना दिसत आहे. याचा अभिमान आपल्याला वाटतो, असे शिंदे यांनी नमूद केले.