Deputy CM Eknath Shinde Replied Uddhav Thackeray: जगातील सर्वांत मोठ्या स्वरुपाचा धार्मिक सोहळा असलेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप झाला. या दिवशी सुमारे १.४४ कोटी लोकांनी पवित्र स्नान केले. तर १३ जानेवारी २०२५ पासून ४५ दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ६६.२१ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. हर हर महादेवच्या जयघोषाने महाकुंभमेळ्याचा परिसर निनादला होता. या महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून विविध पक्षांचे राजकीय नेते, दिग्गज मंडळी, सेलिब्रिटींनी आवर्जून सहभागी होत गंगास्नान केले. या महाकुंभाने अनेक जागतिक विक्रमांना गवसणी घातली असून, याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही घेण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाकुंभमेळ्यात सहभागी झाले होते. यावरून उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. या टीकेचा एकनाथ शिंदे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.
पूर्वी नमस्कार करताना रामराम करायचो, त्याचे श्रीराम कधीपासून म्हणायला लागलो, याचा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राशी गद्दारी करून काही जणांनी गंगेत डुबक्या मारल्या. त्यांनी कितीही डुबक्या मारल्या तरी त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यांनी जे पाप केले आहे ते धुतले जाणार नाही. मला आता गंगेचे पाणी देण्यात आले. मला मान आहे. सन्मान आहे. इकडे ५० खोके घेतले आणि तिकडे गंगेत डुबकी मारली याला काही अर्थ नाही. गंगेत जाऊन कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा डाग तसाच राहणार आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यावर आता एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे.
हे लोक पाप लपवायला लंडनला जातात
बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण टाकण्याचे काम त्यांनी केले होते. ते पाप धुण्यासाठी मी कुंभमेळ्याला गेलो होतो. हे लोक पाप लपविण्यासाठी लंडनमध्ये जातात, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच आमचे सरकार संवेदनशील आहे. पुणे प्रकरण जलदगती न्यायालयात घेऊन नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यापुढे कोणीही आमच्या लाडक्या बहिणींवर अत्याचार करण्याची हिंमत कोणी करता कामा नये. अशा प्रकारचे काम आमचे सरकार करणार आहे, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, राज्यात पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही. मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले. मी अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरायचो. अडीच वर्षांत कधीच मला थकवा आला नाही. कारण, लाडक्या भाऊ आणि बहिणींमुळे मला उर्जा मिळायची. आतापर्यंतच्या कधीच इतके निर्णय घेतले गेले नव्हते. मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून काम केले. मला या राज्यात अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ओळख मिळाली. ही ओळख सर्वात मोठी आहे. गरीबी काय आहे याची जाणिव आम्हाला आहे. त्यामुळे गरिबांना, सर्वसामान्यांना आपल्या शासनाच्या माध्यमातून काही मदत मिळावी यासाठी आम्ही योजना सुरू केल्या, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.